

cozy corner ideas
esakal
कोझी कॉर्नरचा उपयोग जो-तो ज्याच्या-त्याच्या गरजेनुसार करतो. कोणासाठी हा कोपरा पुस्तक वाचण्याची जागा असते, तर कोणासाठी मेडिटेशनची जागा. इथं एखाद्याची सर्जनशीलता फुलते, तर दुसऱ्याला त्याच्यामधलं ‘स्व’त्व गवसतं.
गारठलेला दिवस आता दिवस मावळतीला आलेला, पण रात्रही अजून बरीच दूर... अशा वेळी आपण घरात एकटंच असावं... ताजं आलं घालून केलेला वाफाळता चहा आवडत्या कपामध्ये ओतून घ्यावा, सोबत आवडतं काही खाणं असावं... भवतालाला विसरावं आणि जाऊन बसावं त्या एका आवडीच्या कोपऱ्यात... कोझी कॉर्नरमध्ये!
कोझी कॉर्नर - उबदार कोपरा... नावातच सगळा ‘कोझीनेस’ भरून राहिलाय. हा शब्द मी पहिल्यांदा कुठं ऐकला माहीत नाही. त्याचा नेमका संदर्भ तर खूपच नंतर कळला. अलीकडे घराचं इंटेरियर करताना, घर सजवताना एखादा कोझी कॉर्नरही घरात असायला हवा, असा सूर आसपास ऐकायला मिळतोय. पण ही संकल्पना नक्कीच भारतीय नाही. मुळात एखाद्याला त्याची ‘स्पेस देणं’ हे काय असतं ते आपल्यापैकी अनेकांना अजून उमगलेलं नाही, आणि कोझी कॉर्नरची संकल्पनाच मुळी ‘वैयक्तिक स्पेस’भोवती फिरते.