अमित मोडक
सध्या सुरू असलेले ट्रेडवॉर थांबणे महत्त्वाचे आहे. ट्रेडवॉर थांबले तर करन्सीज स्थिर होतील, मंदी कमी होईल, आणि मग पुन्हा एकदा आर्थिक स्थिती सुरळीत होईल, व्याजदर सुरळीत होतील, गव्हर्नमेट सिक्युरिटीजचे दर सुरळीत होतील. आणि हे सर्व दर सुरळीत झाले, तरच सोन्याचांदीचे भाव स्थिरावतील.
गेल्या काही दिवसांत ट्रम्पसाहेब रोज टॅरिफचे नवे नियम लादत चालले आहेत. ज्या देशांनी टॅरिफच्या नियमांना विरोध करत काउंटर टॅरिफ केली नाहीत त्यांना कन्सेशन देणार असल्याची, तसेच पुढच्या नव्वद दिवसांसाठी टॅरिफ पुन्हा मूळ दहा टक्क्यांपर्यंत आणून ठेवण्याची घोषणाही त्यांनी केली. अमेरिकेला ‘वेल्दीएस्ट’ करण्याची घोषणा सत्यात उतरवण्यासाठी ट्रम्पसाहेब अमेरिकेच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला स्वयंपूर्ण करणार आहेत.
आयात होणाऱ्या वस्तू महाग झाल्या, तर स्थानिक वस्तू विकल्या जातील असे काहीतरी त्यांच्या डोक्यात असावे. राष्ट्रांना त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवण्यासाठी किंवा अमेरिकेकडून होणाऱ्या आयातीवरचे आयातशुल्क कमी करण्यासाठी त्यांनी हा तीन महिन्यांचा अवधी दिला आहे.