

Himalayan cycling adventure
esakal
महेश गोखले
नंदादेवी आणि त्रिशूल ही हिमशिखरे स्वर्गासारखी दिसत होती.
निळ्याशार आभाळाच्या पार्श्वभूमीवर ही शुभ्र हिमशिखरे पांढरा कार्डबोर्ड कापून तयार केल्यासारखी स्पष्ट आणि रेखीव दिसत होती. ग्राउंड झीरोपासून साधारणपणे ७,५०० फूट वर आल्यानंतर दिसत असलेली देवभूमी अवर्णनीय होती!
उन्हात भाजून निघणाऱ्या भारतीय पठारी प्रदेशातून हवापालट करायचा असेल, तर गढवाल हिमालयात फारशी प्रसिद्ध नसलेली जागा म्हणजे धानोल्टी. या ठिकाणी शांतता, निसर्ग आणि हिमालय यांचा त्रिवेणी संगम जवळून अनुभवता येतो. या मार्गावर तुम्ही सायकलीने फिरू शकलात, तर तुमच्यात विलक्षण ऊर्जा आहे, असे समजावे. आम्ही या मार्गावर सायकलीने फिरायचे ठरवले. आमचा सायकल परिक्रमामार्ग ऋषिकेश - डेहराडून - रामपूर - मसूरी - झारीपनी, बर्लोगंज - चंबा - धानोल्टी - मालदेवता - सहस्रधारा - डेहराडून असा होता. या मार्गाची समुद्रसपाटीपासून उंची २,२८६ मीटर इतकी आहे.