

David Attenborough and Nature Conservation
esakal
वर्षा गजेंद्रगडकर
शंभरी पार केल्यानंतर आजही कार्यमग्न असलेले ॲटनबरो संपूर्ण सजीव सृष्टीचा आवाज झाले आहेत; तज्ज्ञ अभ्यासक असूनही सागरी रहस्यांपासून नव्या प्रजातींपर्यंतच्या प्रत्येक विषयात सहज संवाद साधण्याची, मार्गदर्शकाची त्यांची भूमिका या क्षेत्रामध्ये आजही अपूर्व म्हणावी अशीच आहे. खरंतर या क्षेत्रातल्या प्रत्येक निर्मितीच्या गुणवत्तेसाठी डेव्हिड ॲटनबरो हा प्रमाणीकरणाचा शिक्का ठरावा, इतका त्यांच्या या कार्यक्रमांचा दर्जा अत्युच्च राहिला आहे.
सजीव सृष्टीचे नवनवोन्मेष शोधत, त्यांचं मानवी आयुष्यातलं महत्त्व स्पष्ट करत, माणूस आणि सृष्टी यांच्यातल्या नात्याला पुन्हापुन्हा उजाळा देत डेव्हिड ॲटनबरो यांनी शंभर वर्षांचा टप्पा पार केला आहे. त्यांना सृष्टीचा गाभा समजला, तिचा अनाहत नाद त्यांनी ऐकला आणि तिच्या रूप-रस-गंधांचा अनुभव घेताना तिच्या जिवंतपणाचं आणि संतुलनाचं मोल त्यांनी अचूक जाणलं. बदलत गेलेलं रूपही त्यांना लख्ख दिसलं. म्हणूनच तिच्यावर आलेल्या संकटांची नेमकी चाहूल त्यांना लागली आणि आपल्याला ते सावध करत राहिले. अशा सजग विद्वानाचं ऋण फेडायचं तर त्याची हाक आपण ऐकायला हवी.
सध्याची जगभरातली नैसर्गिक संकटं पाहता, भविष्याबाबत फार आशादायी चित्र डोळ्यासमोर उभं राहत नाही. पुढच्या काही वर्षांनी, शतकांनी कधीतरी कदाचित अशी वेळ येईल, जेव्हा जंगलाच्या शांततेत पक्ष्यांचा आवाज आपल्याला ऐकू येणार नाही, समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूत उमटणाऱ्या काही पाऊलखुणा कायमच्या पुसल्या गेलेल्या असतील आणि पुढच्या पिढ्यांना आपण ज्या समृद्ध पृथ्वीच्या गोष्टी-अनुभव सांगत आलो आहोत, त्या केवळ आठवणी उरतील. असं काही होईल, न होईल, पण आज आपल्याजवळ काहीतरी आश्वासक आहे. या ग्रहाच्या प्रत्येक स्पंदनाची नोंद घेणारी, निसर्गाच्या अदृश्य-अलक्षित कहाण्या जगासमोर आणणारी आणि त्याच्या सौंदर्यामागचं रहस्य आपल्याला उलगडून सांगणारी काही विलक्षण माणसं आपल्यात होती आणि आजही आहेत, हे आपलं भाग्यच म्हणायला हवं. हेन्री डेव्हिड थोरो असतील, मारुती चितमपल्ली असतील किंवा सर डेव्हिड ॲटनबरो असतील; या माणसांनी आयुष्यभर केवळ निसर्ग पाहिला नाही, त्यांनी त्याला लक्षपूर्वक ऐकलं, मनापासून समजून घेतलं, त्याच्या श्वासात आपले श्वास मिसळले आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्याचं विराटपण, त्याची अद्भुतता आणि मानवी आयुष्यासोबत गुंफली गेलेली त्याची नाजूक वीण आपल्याला स्पष्ट करून सांगितली.