

Decluttering
esakal
‘‘तुला काय नकोय ते ओळख, ज्या गोष्टी टाकूनच देण्यायोग्य आहेत त्यात नस्ती भावनिक गुंतवणूक होऊ देऊ नकोस. काय वेळीच सोडायचं, काय टाकायचं आणि काय जपून ठेवायचं हे एकदा शिकलास, की सोपं होईल सगळं,’’ आपली आई फक्त साफसफाईबद्दल बोलत नाहीये हे त्याला उमजलं होतं. शहाण्याला शब्दाचा मार हे तिचं तंत्र तो लहानपणापासून बघत होता.
दगदगीचा दिवस खरंतर त्याच्यासाठी नवा नव्हताच. रोज मरमर करत वीस-पंचवीस किलोमीटर जायचं, बॉसची कटकट ऐकून घरी यायचं, जेवायचं, झोपायचं, झालंच तर एखाद्या वीकेंडला मित्रांबरोबर बाहेर जायचं एवढंच काय ते जगणं. चाकरमानी आयुष्याच्या नावाखाली, ‘हे सगळं सगळ्यांच्या वाट्याला येतंच’ असं म्हणत रोजची कुतरओढ थोडीफार सहन करायची, हा त्याचा दिनक्रम. एव्हाना त्याचंही काही वाटेनासं झालं होतं त्याला.