रोहन नामजोशी
दिल्लीच्या परिसरांची ओळखच आता तिथल्या मेट्रोच्या रंगांनी व्हायला सुरुवात झाली आहे. उदाहरणार्थ, साकेतला राहतो असं म्हणताच, ‘अच्छा यलो लाइनवर?’ किंवा ‘वैशालीहून गुरुग्राम म्हणजे मधे बदलावी लागत असेल’ असे संवाद घडतात. जवळचं मेट्रो स्टेशन कोणतं, यावरून पत्ते सांगितले जातात.
मेट्रो आता लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहे. ती ‘लाइफलाइन’ झाली आहे, असं इतक्यात म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल. कारण दिल्लीत अजूनही खासगी वाहनं, कॅब्ज, ऑटो, सायकल रिक्षा, इ-रिक्षा अशी वाहतुकीची अमाप साधनं आहेत. पण मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार बघता ती काही काळातच लाइफलाइन होईल यात शंका नाही.
संध्याकाळची वेळ. तुम्ही रस्त्यावरून जात आहात... अंधार पडतो ना पडतो, तोच करड्या रंगाच्या डब्यांची रांग एका पुलावरून जात असते. त्या डब्यांमध्ये पिवळे, हलके निळे असे दिवे लागलेले असतात. दागिन्याची एखादी माळ आपल्या डोळ्यांसमोरून जात आहे, असा भास होतो. दिल्ली मेट्रोच्या अनेक विहंगम दृश्यांपैकी ही काही निवडक दृश्यं.