धीरज वाटेकर
डॉ. अर्चना जगदीश यांनी लिहिलेला देवराई आख्यान हा ग्रंथ देवराया, पवित्र निसर्ग परंपरा व पर्यावरणासारख्या विषयात रुची घेऊन काम करू इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शक दस्तावेज आहे. निसर्ग आणि परंपरा यांची सांगड घालणाऱ्या भारतातील एका प्राचीन परंपरेचा दुवा म्हणून या ग्रंथाकडे पाहायला हवे. देवराया जैवविविधता संरक्षणासाठी मोठी संधी उपलब्ध करून देतात.
सरकारी प्रयत्न आणि कायदा यांशिवाय टिकणाऱ्या जैवविविधतेचे उदाहरण म्हणजे पारंपरिक देवराया. प्राचीन काळातल्या एखाद्या मोठ्या जंगलाचा आजही टिकून असणारा भाग म्हणजे देवराई.
नव्याने जंगल तयार करताना किंवा मानवी विकृतीतून तोड झालेल्या जंगलांचे पुनर्जतन करण्याची वेळ येईल तेव्हा देवरायांकडे संदर्भ म्हणून बघता येईल. आजूबाजूचा कित्येक एकर परिसर उजाड असताना तिथलीच नजरेला जाणवणारी देवराईतील मोजकी हिरवाई पर्यावरणीय आशेचा शेवटचा किरण असल्याचे देवराई आख्यान समजावून सांगते.