

Dhapewada Textiles
esakal
धापेवाडा गावात प्रवेश केल्यावर थोड्याच अंतरावर धापेवाडा टेक्स्टाइल्सचा परिसर नजरेत भरतो. या तीन मजली इमारतीत प्रवेश केल्यावर सारे हात कामात गुंतलेले दिसतात. तिसऱ्या मजल्यावर ऐकू येते ती हातमागाची खटखट आणि डोळ्यांना सुखावतात रंगीबेरंगी धाग्यांमधून विणल्या जाणाऱ्या मनमोहक साड्या...
विदर्भातील नागपूरजवळचे छोटेसे गाव धापेवाडा. विदर्भाची पंढरी असलेल्या या गावी चंद्रभागेच्या काठी विठ्ठल-रखुमाईचे प्राचीन मंदिर आहे. आषाढी-कार्तिकीला इथे यात्रा भरते. वारकऱ्यांच्या दिंड्या येतात. चंद्रभागेच्या वाळवंटात ग्यानबा-तुकारामचा गजर घुमतो. हेच पुरातन धापेवाडा गाव केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे मूळ गाव. त्यांचे बालपण या गावात गेले. या गावाची आणखीही एक महत्त्वाची ओळख होती, ती म्हणजे हे गाव साड्या विणण्यासाठी प्रसिद्ध होते. सारे गावच विणकरांचे! इथे प्रत्येक घरात हातमागावर उत्तमोत्तम साड्या विणल्या जायच्या. ही खूप जुनी गोष्ट नाही, अगदी अलीकडे पाच-पन्नास वर्षापूर्वीपर्यंतची. तेव्हा इथल्या माय-माउलींच्या अंगावर सोन्याची झळाळी होती. वस्त्रोद्योगांमुळे गावात श्रीमंती होती. इथल्या वस्त्रांना प्रचंड मागणी होती. मात्र हळूहळू यांत्रिकीकरणाचे युग आले आणि हातमागावर साड्या विणण्याचा हा व्यवसाय मागे पडत गेला. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली ही कला गावातील नवी पिढी विसरली. विणकर संस्था एकामागोमाग बंद पडत गेल्या. विणकरांच्या हातचे काम गेले. रोजगार गेला. नितीन गडकरींनी ही गोष्ट हेरली आणि त्यांनी या गावाचे वैशिष्ट्य असलेली ही कला पुनरुज्जीवित करण्याचे ठरवले.