
प्रतिनिधी
तळपायाला झालेली छोटीशी जखम घेऊनच १५ ऑगस्टच्या मोठ्या सुटीनिमित्त बहिणीकडे गेलेलो. तेव्हा त्या जखमेचे गांभीर्य जाणवले नाही. मात्र चार-पाच दिवसांतच पाय प्रचंड दुखायला लागला. खरेतर बायको डॉक्टर. मागे एकदा दुसऱ्या पायाला अशीच जखम होऊन पायाची बिकट अवस्था झालेली तेव्हा केवळ होमिओपॅथीच्या औषधाने सगळ्या बाबींवर मात करता आलेली. यावेळी मात्र काही कळेना, जखम बरी होईना. होमिओपॅथी, ॲलोपॅथी सगळी औषधे घेतली. जखम आज सुकेल उद्या सुकेल असे वाटत होते. जवळच्या एका निष्णात जनरल सर्जनला जखम दाखवली. त्यांनी आधी शुगर तपासली, पटकन इन्सुलिनचा डोस दिला. ते म्हणाले, ‘अरे, शुगर केवढी वाढली आहे. कशी जखम बरी होईल लगेच?’ त्यादिवशी त्यांनी काही टेस्ट केल्या आणि काही औषधे दिली. त्यानंतर चार दिवस गेले.