Premium|Traditional Indian Attar : परफ्युमच्या जमान्यातही अत्तराची क्रेझ कायम; जाणून घ्या 'मिट्टी' ते 'ऊद' अत्तराचा शाही प्रवास

Perfumes and Fragrances : पुण्यातील पेठांपासून कन्नौजच्या सुगंधी वारशापर्यंत, पारंपरिक आणि आधुनिक अत्तरांचा दरवळ आजही तरुणाईसह सर्वांना भुरळ घालत आहे.
Traditional Indian Attar

Traditional Indian Attar

esakal

Updated on

विश्वजीत राळे

अत्तराची परंपरा जुनी असली, तरी दिवसेंदिवस त्याचं स्वरूप बदलत चाललंय. पारंपरिक अत्तरांबरोबरच आता नवनवीन अत्तरं बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. इन्टिमेट, मजनू (मजमुआ), फिरदोस, डिझायर, अझारो यांसारखी पूर्वापार वापरली जाणारी अत्तरं आपली ओळख टिकवून आहेतच, पण त्याचवेळी अनेक नवे ब्रँड, ट्रेंडी सुवासदेखील तरुणाईच्या पसंतीस उतरत आहेत.

पुण्याच्या रविवार पेठेतून किंवा शुक्रवार पेठेतून फिरताना अत्तरांच्या विविध दुकानांकडे आणि त्या दुकानांमधून दरवळणाऱ्या सुगंधानं तिकडं लक्ष वेधलं जातंच. गेल्या कित्येक वर्षांपासून हा सुवास इथल्या पेठांमधून दरवळतोय. अगदी १०० वर्षं जुनी अत्तराची दुकानं इथं पाहायला मिळतात. हरिदास माधवदास, व्ही. एन. सन्स, जहागिरदार अत्तरवाले, दामोदरदास सुगंधी अशा पारंपरिक दुकानांपासून ते अगदी अलीकडच्या काळात थाटलेल्या दुकानांपर्यंत कित्येक नव्या-जुन्या दुकानांमध्ये अत्तरांचा सुगंध दरवळतोय. आधुनिक परफ्युमच्या जमान्यातदेखील ही दुकानं आपली ओळख टिकवून आहेत. पिढ्यान्‌पिढ्या हा व्यवसाय केला जात आहे, आणि अत्तर खरेदी करण्यासाठी अत्तर शौकिनांची नेहमीच इथं गर्दी पाहायला मिळते. या दुकानांमध्ये शिरताच इथं असलेल्या नानाविध प्रकारच्या व विशिष्ट प्रकारची डिझाईन्स असलेल्या अत्तरांच्या बाटल्या, ज्याला ‘अत्तरदाणी’ किंवा ‘कुपी’ असं म्हटलं जातं; त्या बाटल्यांमध्ये साठवून ठेवलेली विविध प्रकारची अत्तरं आणि त्या अत्तरांचा दरवळ यात आपणदेखील हरवून जातो. मीदेखील असाच या दुकानांकडे खेचला गेलो. एनकेएस अरोमाजचे तिसऱ्या पिढीतील व्यावसायिक प्रतिक सेमलानी सांगतात, ‘‘१९८२मध्ये माझ्या आजोबांनी धुळ्यात पहिलं दुकान सुरू केलं. धुळ्याबरोबरच पुण्यात आमची दुकानं आहेत. गेल्या बारा वर्षांपासून पुणे आणि आसपासच्या परिसरात आम्ही होलसेल दरात अत्तरांची विक्री करतोय. कमी भांडवलातदेखील हा व्यवसाय सुरू करता येतो. सध्या एकट्या पुण्यात आमच्या चार शाखा आहेत. बहुतेक परफ्युम करण्यासाठी अत्तर वापरलं जातं. आजच्या तरुणाईलादेखील अत्तराची क्रेझ आहे. त्यामुळे आगामी काळातदेखील अत्तर वापरण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाईल.’’

अगदी तरुणाईपासून ते ज्येष्ठांपर्यंत आणि पुरुषांपासून महिलांपर्यंत साऱ्यांनाच भुरळ घालणारं असं हे ‘अत्तर’!

‘इतिर’ या पारशी शब्दापासून ‘अत्तर’ हा शब्द आलाय, त्याचा अर्थ ‘सुगंधी द्रव्य’ असा होतो. पण तुम्हाला माहितीये का, हे अत्तर तयार कसं केलं जातं? ताजी फुलं आणि इतर सुगंधी मालापासून अत्तर तयार होतं. त्यासाठी विविध सुगंधी फुलांसोबतच निरनिराळ्या वनस्पतीदेखील वापरल्या जातात. अत्तराच्या प्रकारानुसार हा कच्चा माल निरनिराळा असतो. प्रामुख्यानं सांगायचं झालंच, तर ईशान्य भारतातून, विशेषतः आसाम आणि आसपासच्या प्रदेशातून ‘ऊद’ आणली जाते; ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या भागातून ‘केवडा’ आणला जातो; दक्षिण भारतातून ‘चंदन’ मिळतं; तर उत्तर प्रदेशातील कन्नौज आणि आसपासच्या परिसरात ‘गुलाब’ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो. अशा विविध ठिकाणांहून कच्चा माल आवश्यकतेनुसार गोळा केला जातो आणि त्यानुसार अत्तराची निर्मिती केली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com