प्रतिनिधी
दीपावली. भारतभरात आणि भारतीय मंडळी जगात जिथे जिथे पोहोचली आहेत अशा सर्व भागांत साजरा होणारा प्रकाशोत्सव. वसुबारसेपासून सुरू होणारा आणि पुढे त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत चालणारा हा चैतन्याचा, प्रकाशाचा लोकोत्सव असंख्यांची आयुष्ये उजळून टाकत असतो.
नवरात्रीची शेवटची माळ संपता संपता दिवाळीची चाहूल लागत असते. दसऱ्याचं शिलांगण घडतं तेच मुळी उंबऱ्याशी येऊ घातलेल्या दिवाळीची लगबगीचा सांगावा घेऊनच. विजयादशमीनंतर येते शुभ्र चांदण्याचा शिडकावा करणारी कोजागरी -शरद पौर्णिमा. आताच्या हवामान बदलाच्या घेऱ्यात अजूनही शरदाच्या या रात्री आल्हाददायक वाटत असतात. शहरी जगण्यातले खरेदीचे, नव्या मुहूर्तांचे, दिवाळीच्या सुट्ट्यांचे बेत झालेले असतात, कास्तकारांचं जग धान्यानं भरलेलं असतं, आणि दीपोत्सव आपल्याला हळूहळू वेढून घेत असतो.