Premium|Thin Poha Chivda Recipe : दिवाळीसाठी बनवा कुरकुरीत चिवडा

Diwali Chivda Recipes : दिवाळीच्या फराळासाठी पातळ पोह्यांचा खमंग चिवडा आणि कढीपत्ता चिवडा घरी बनवा. पोहे, शेंगदाणे, मसाले आणि कुरकुरीत कढीपत्त्यापासून चविष्ट चिवडा तयार करण्याच्या सोप्या पाककृती जाणून घ्या.
Thin Poha Chivda Recipe

Thin Poha Chivda Recipe

esakal

Updated on: 

राजश्री अनिल बिनायकिया

दिवाळीच्या फराळामध्ये अग्रभागी असतो खमंग, चमचमीत आणि खुसखुशीत चिवडा. गोड पदार्थांबरोबरच चिवड्याची खमंग चव जिभेवर रेंगाळते आणि तोंडाला चांगलंच पाणी सुटतं. चिवडा या पदार्थाशिवाय दीपावली अपूर्ण असल्यासारखीच वाटते. सर्वांच्या आवडत्या तिखट पदार्थाच्या काही पाककृती...

पातळ पोह्यांचा चिवडा

साहित्य

पाचशे ग्रॅम पातळ पोहे, १ वाटी पंढरपुरी डाळे, २ वाटी शेंगदाणे, १ वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप, पाव वाटी कढीपत्ता, प्रत्येकी १ टेबलस्पून धने-जिरे पूड, २ टेबलस्पून हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धी वाटी भाजलेले तीळ, पाव वाटी खसखस, चवीनुसार मीठ, पिठीसाखर, पाव वाटी काजूचे काप, तेल व फोडणीचे साहित्य.

कृती

पोहे प्रथम मंद गॅसवर किंवा मायक्रोवेव्हमध्ये छान भाजून घ्यावेत. मग एक वाटी तेलात शेंगदाणे, डाळे, खोबऱ्याचे काप तळून ते बाजूला काढून ठेवावेत. त्यानंतर मिरचीचे तुकडे व कढीपत्ता त्याच तेलात कुरकुरीत तळून घ्यावा. त्या तेलात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. मग फोडणीमध्ये आधी तळलेले सर्व साहित्य, मसाले, मीठ, तीळ, खसखस, पिठीसाखर व पोहे घालावेत. मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे. पातळ पोह्यांचा चिवडा तयार.

कढीपत्ता चिवडा

साहित्य

अर्धा किलो तळलेले जाड पोहे, ३ वाटी कढीपत्त्‍याची ताजी पाने, अर्धी वाटी हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे,

१ वाटी शेंगदाणे, चवीनुसार पिठीसाखर, मीठ, १ टीस्पून आमचूर पूड, तेल.

कृती

एक वाटी तेलात शेंगदाणे, कढीपत्ता व हिरव्या मिरचीचे तुकडे खरपूस तळून घ्यावेत. आता एका पातेल्यामध्ये तळलेले पोहे, शेंगदाणे, मीठ व आमचूर पूड घालावी. त्यानंतर मिरच्या आणि कढीपत्ता हातानेच चुरून चिवड्यामध्ये घालावा. शेवटी चिवडा छान मिक्स करून बरणीत भरावा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com