Premium|Diwali Faral Tips : फराळ करताय? हे लक्षात ठेवा...

How to Make Perfect Diwali Faral : दिवाळीचा फराळ बनवताना बेसन लाडू दाणेदार आणि चिवडा कुरकुरीत होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा. योग्य भाजणी, तुपाचे प्रमाण आणि फोडणीमुळे पदार्थ चविष्ट बनतात.
How to Make Perfect Diwali Faral

How to Make Perfect Diwali Faral

esakal

Updated on: 

नेहा काडगावकर

दिवाळी म्हटली, की डोळ्यांसमोर येते ते चविष्ट फराळाचे ताट. फराळ करणे खरेतर कला आहे, पण त्याचवेळी ती अनेकांसाठी कसरतही असते. फराळाचे विविध पारंपरिक पदार्थ करताना ते फसण्याची शक्यता असते. परंतु, काही बारकावे लक्षात घेऊन पदार्थ केल्यास ते पदार्थ हमखास जमून येतात व फराळाची चवही वाढते...

बेसन लाडू

१. लाडवासाठी थोडे जाडसर व चांगल्या दर्जाचे बेसन वापरावे. त्यामुळे लाडवांना दाणेदार पोत येतो. बेसन खूप जुने किंवा उग्र वासाचे नसावे. बेसन चाळून घ्यावे, जेणेकरून गुठळ्या राहत नाहीत.

२. बेसन मंद आचेवर भाजावे. दाणेदार लाडू हवे असतील, तर बेसन भाजल्यानंतर दुधाचा हबका मारावा, म्हणजे मिश्रण फुलून येते व लाडवाला छान टेक्स्चर येते. सुरुवातीला तूप घालून बेसन एकत्र करावे व सतत हलवत राहावे. बेसन मोठ्या आचेवर व अतिप्रमाणात भाजू नये, असे केल्यास बेसन बाहेरून भाजले जाते, पण आतून कच्चे राहू शकते. कच्च्या बेसनाचा वास पूर्णपणे जाऊन खमंग वास येईपर्यंत भाजावे. बेसन हलकेसे फुगल्यासारखे आणि मोकळे दिसू लागले की ते भाजले गेले असे समजावे. बेसन थोडे थोडे भाजावे आणि समान आचेवरच भाजावे.

३. तुपाचा वापर करताना तूप टप्प्याटप्प्याने, गरजेनुसार घालावे. भाजताना जाळू नये. तूप कमी पडले, तर लाडू वळताना पीठ कोरडे होऊ शकते. तूप जास्त झाल्यास लाडू तूपकट होतात व त्यांचा आकार बिघडतो.

४. लाडवांमध्ये शक्यतो बारीक पिठीसाखर घालावी. बेसनात साखर घालण्याआधी चाळून घ्यावी, जेणेकरून लाडवांत साखरेचे मोठे कण राहत नाहीत. बेसन भाजून झाले, की त्यात लगेच साखर घालू नये नाहीतर त्यात साखर वितळू शकते. मिश्रण थोडे कोमट होऊ द्यावे. बेसन पूर्णपणे थंड झाल्यानंतरही साखर घालू नये, अन्यथा लाडू वळणे कठीण जाऊ शकते. साखरेचे प्रमाण आपल्या चवीप्रमाणे ठरवावे. मिश्रणात चिमूटभर मीठ घातल्यामुळे गोडपणा बॅलन्स होतो आणि बेसनाची चव खुलते.

५. मिश्रणात वेलची पूड शेवटी घालावी, जेणेकरून सुगंध अधिक काळ टिकतो. सुकामेवा घालणार असाल, तर तो थोडा भाजून घ्यावा. सुकामेवा शक्यतो भरड वापरावा. यामुळे लाडू वळताना त्यात मोठे तुकडे उरत नाहीत.

६. लाडू वळताना त्यात थोडे कोमट तूप घालावे व हाताने व्यवस्थित मळावे. मिश्रण सैल व तूपकट झाले, तर त्यात थोडे भाजलेले बेसन एकत्र करावे. लाडू वळतच नसतील किंवा हाताला खूप चिकटत असतील, तर त्यात थोडे तूप घालावे व पाच ते दहा मिनिटे थांबून लाडू वळावेत.

चिवडा

१. पोहे शक्यतो ताजे आणि कोरडे असावेत. पोहे आधी चाळून घ्यावेत, म्हणजे त्यातील बारीक पूड व कचरा निघून जातो.

२. पोहे भाजताना मंद ते मध्यम आचेवर भाजावेत. जास्त भाजू नयेत. हलके, कुरकुरीत झाले की गॅस बंद करावा. भाजताना सतत हलवत राहावे. पोहे ओव्हनमध्ये किंवा एअर फ्रायरमध्येही भाजू शकता.

३. चिवड्यातील प्रत्येक पदार्थ, म्हणजेच शेंगदाणे, डाळे, काजू, सुक्या खोबऱ्याचे काप, मखाणे स्वतंत्र भाजावेत. शेंगदाणे मंद आचेवर तळावेत. काळपट तळू नयेत. डाळे जास्त वेळ तळू नये. गडद रंग होण्याआधीच काढावे. सुके खोबरे मंद आचेवर तळावे, कारण सुके खोबरे पटकन तपकिरी होते.

४. फोडणीत गरजेनुसार तेल घालावे. चिवड्याला फक्त कोटिंग मिळेल इतकेच तेल पुरेसे असते. प्रथम मोहरी घालून ती तडतडल्याशिवाय पुढचे पदार्थ घालू नयेत. मोहरीनंतर जिरे, तीळ, कढीपत्ता, हिरवी मिरची या क्रमाने पदार्थ घालावेत. हिंग फोडणीच्या शेवटच्या टप्प्यात घातल्यास सुगंध टिकतो व जळत नाही. कढीपत्ता घालताना तो पूर्णपणे कोरडा करून घालावा. हिरवी मिरचीही पूर्णपणे कोरडी करून घालावी. हिरवी मिरची चिवड्यात ओलसर राहिल्यास चिवडा लवकर नरम होऊ शकतो. हळद खूप जास्त घातल्यास चिवडा फक्त पिवळा दिसतो व हळदीची चवही जाणवते. त्यामुळे हळद योग्य प्रमाणात घालावी.

५. चिवडा थोडा थंड झाल्यानंतर पिठीसाखर घालावी. गरम मिश्रणात साखर घातल्यास ती वितळून चिवडा चिकट होऊ शकतो. मीठ घालताना सुरुवातीला थोडेच मीठ घालावे. नंतर चवीनुसार गरज वाटल्यास पुन्हा मीठ घालावे.

६. चिवडा एकदम जोरात कालवू नये. यामुळे भाजलेले पोहे तुटतात. मोठ्या परातीत चिवडा पसरून मग एकत्र करावा. हलक्या हाताने खालून वर हलवावा. यामुळे पोहे तुटत नाहीत.

७. फोडणी एकाच ठिकाणी न घालता चिवडा हलवत हळूहळू घालावी. चिवडा एकजीव करताना फोडणी सर्व पोह्यांना समान लागली पाहिजे.

८. पोहे कुरकुरीत न भाजणे, हिरवी मिरची व कढीपत्त्यामध्ये आर्द्रता राहणे, ओले खोबरे वापरणे, जिन्नस पूर्ण थंड न होऊ देणे, चिवडा गरम असतानाच हवाबंद डब्यात भरणे, फोडणीत पाणी उडणे या कारणांमुळे चिवडा नरम पडू शकतो.

९. चिवडा तेलकट किंवा कोरडा होण्याची काही कारणे आहेत. तेलाचे प्रमाण जास्त झाल्यास चिवडा तेलकट होतो. अतिगरम तेलात जिन्नस घातल्यास ते तेल शोषून घेतात. चिवडा खूप कोरडा झाल्यास थोडे गरम केलेले फोडणीचे तेल त्यात एकजीव करावे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com