

Valentine’s Day love Reflections
esakal
डॉ. हेमंत बा. अय्या
काकुणास ठाऊक, पण माझं हे नेहमी असंच होतं. व्हॅलेंटाइन डे जवळ यायला लागतो आणि सगळं माहीत असूनही मला लिहावंसं वाटतं; थोडंसं आपल्या वयापेक्षा लहान होऊन प्रेमाबद्दल विचार करावासा वाटतो. एरवी आपल्या धकाधकीच्या जीवनात ‘सतरा-अठरा’ पार झाले, की प्रेमाबद्दल निवांत विचार करायला तसा फारसा वेळ उरत नाही. एखाद्या जागी शांत बसून प्रेमाबद्दल विचार करावा, प्रेमावर काही लिहावं असं म्हणून लेखन सुरू केलं, तर त्या भावनेतला नाजूकपणा लेखनात काडीमात्र उतरत नाही. मग मीच स्वतःला विचारू लागतो, ‘एवढे प्रेमासाठी नालायक झालो आहोत का आपण?’ की आयुष्यातल्या गांभीर्यांनी प्रेमासारख्या अत्यंत गंभीर विषयावर विचार करण्याचं बळच आपल्यातून हिसकावून नेलंय? व्हॅलेंटाइन्स डे जवळ आला की गुलाब फुलतातच...! पण माझ्या मनात प्रश्न फुलतो... ‘आपण अजून प्रेमात आहोत का? की फक्त सवयींत? गृहीत प्रेमाच्या?’