

Quantum Key Distribution
esakal
लष्करी क्षेत्रातील सुरक्षित आणि अभेद्य संदेश संप्रेषणासाठी भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) क्वांटम की डिस्ट्रिब्युशन (क्यूकेडी) प्रणालीची नुकतीच यशस्वी चाचणी घेतली. भविष्यातील आव्हानांचा विचार करता, ही क्वांटम की डिस्ट्रिब्युशन प्रणाली केवळ सायबर क्षेत्रातील संभाव्य धोक्यांचा सामना करण्यापुरती मर्यादित राहणार नसून देशाच्या संरक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम करणे, संवेदनशील माहितीचे अभेद्य संरक्षण करणे आणि राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
भारतातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) बंगळूरस्थित टॅकबिट लॅब्ज या डीप-टेक स्टार्टअपच्या सहकार्याने अत्याधुनिक क्वांटम की डिस्ट्रिब्युशन (क्यूकेडी) प्रणाली विकसित केली आहे. फायबर-आधारित या स्वदेशी प्रणालीमुळे भविष्यात भारताला पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षित क्वांटम संप्रेषण नेटवर्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, संरक्षण दलांसह राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहितीची देवाणघेवाण अधिक सुरक्षितपणे करण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.