

Dual Degree Program
esakal
मीनाक्षी गुरव
जग सातत्याने बदलत असून त्या बदलाचा वेग साधण्यासाठी आता विद्यार्थ्यांनाही वेगाने ज्ञान मिळवावे लागणार आहे. बदलत्या जागतिक बाजारपेठेत बहुविद्याशाखीय ज्ञानाला मोठी मागणी आहे. ‘एकावेळी एकच पदवी’ या पारंपरिक चौकटीला मोडून काढत विद्यार्थ्यांना एकाच कालावधीत दोन वेगवेगळ्या पदव्या घेण्याची मुभा आता मिळत असल्याने हा पर्याय विद्यार्थ्यांसाठी खरोखरच सुवर्णसंधी ठरत आहे.
प्रसंग एक : गौरी मसुरकर आणि सानिका परब दोघी चांगल्या गुणांनी बारावी उत्तीर्ण झाल्या आहेत. गौरीने बारावीनंतर बीई अभ्यासक्रमाचा पर्याय निवडला. नामांकित महाविद्यालयात बीई (डेटा सायन्स) अभ्यासक्रम करतानाच तिने बी.एस्सी. इन कॉम्प्युटर सायन्स असा अभ्यासक्रम निवडला. तर, सानिकाने बीई (डेटा सायन्स ॲण्ड एआय) हा अभ्यासक्रम निवडला. चार वर्षानंतर गौरीकडे दोन पदव्या आणि सानिकाकडे एक पदवी. दोघीही नोकरीसाठी प्रयत्न करत असताना गौरीकडे एकाच कालावधीत दोन पदव्या असल्यामुळे तिला नोकरीच्या अधिक संधी मिळू लागल्या.
प्रसंग दुसरा : बारावीनंतर अनिकेतने बी.एस्सी. इन डेटा सायन्स/ एआय ॲण्ड रोबोटिक्स तत्सम पदवी अभ्यासक्रम निवडला. त्या जोडीला त्याने बीए इन फ्रेंच हा अभ्यासक्रमही निवडला. एकीकडे अनिकेत दुहेरी पदवी अभ्यासक्रम करत असताना, दुसरीकडे त्याचाच मित्र अमित याने बीई हा पदवी अभ्यासक्रम निवडला. चार वर्षांनंतर अनिकेतकडे दोन पदव्या आणि अमितकडे एक पदवी. अनिकेत बी.एस्सी.सह त्याच कालावधीत एक परदेशी भाषा शिकला आणि त्यातील अभ्यासक्रम पूर्ण केल्याने त्याला पटकन परदेशातील कंपनीमध्ये चांगल्या पगाराची ऑफर मिळाली. अमितलाही पुण्यातच एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी लागली.