

Dussehra Festival and Gratitude Tradition
esakal
अदिती मराठे
तलवारीपासून लॅपटॉपपर्यंत, नांगरापासून कीबोर्डपर्यंत आणि आपल्या रोजच्या जगण्यातल्या छोट्या-मोठ्या सगळ्या आयुधांपर्यंत कृतज्ञतेची ओंजळ पोहोचवू या. रोजच्या आयुष्यात आपण कालपेक्षा आज थोडं अधिक शिकलो, थोडं अधिक सक्षम झालो आणि आपल्या माणसांना सोबत घेऊन पुढे चालत राहिलो याचं समाधान बाळगत, विजयाची ही दशमी कृतज्ञतापूर्वक साजरी करू या!
आपण भारतीय लोक कृतज्ञता पोटात घेऊनच जन्माला येतो असं मला कित्येकदा वाटतं. अगदी शाळेच्या पहिल्या दिवसापासून शिक्षक आपले ‘गुरू’ आहेत हे मुलांना सहज शिकवलं जातं. ज्ञान देणाऱ्याला आदर देणं, गुरू मानणं भारतीय तत्त्वज्ञानानं जगाला शिकवलंय. आमच्या आयटी क्षेत्रात मात्र नोकरीच्या पहिल्या दिवशी सगळ्यांना सांगतात, ‘इथं कोणी कोणाचा सर नाही, सगळ्यांना नावानं हाक मारायची!’ पाश्चात्त्य जगातून आलेल्या समानतेच्या या विचारसरणीला गुरू वगैरे संज्ञा शिकवणं फार कठीण काम असतं. त्यांना कसं सांगावं की आपण भारतीय कृतज्ञतेनं अगदी भरल्या ताटालाही जेवणापूर्वी हात जोडतो, शिक्षकाबद्दलचा आदर दाखवायला आपल्याकडे गुरुपौर्णिमेचा वेगळा दिवस असतो, निसर्गाप्रति-समुद्राप्रति कृतज्ञता व्यक्त करायला नारळीपौर्णिमा साजरी करतो, बैलपोळ्याला शेत नांगरणाऱ्या बैलजोडीचे कृतज्ञतेपोटीच लाड करतो, नागपंचमीच्या सणाबद्दल आपल्या कृषिप्रधान देशात अंमळ जास्त प्रेम असतं आणि दसऱ्याच्या दिवशी आपलं रोजचं काम सुकर करणाऱ्या आयुधांबद्दल कृतज्ञ असतो.