

Ashadh first rain feature
esakal
कविता मेहेंदळे
आषाढातल्या सुरुवातीच्या पावसाची एक गंमत आहे. हातचं काही राखून न ठेवता हा पाऊस धुवांधार बरसतो. कधी वायूसोबत तिरप्या धारा नर्तन करतात. कधी पत्र्याच्या छतावर तडतड नाद करतात. पावसात खेळायला गेलेली मुलं कुडकुडत परत येतात. तळ्या-खळग्यात सुरुवातीला नखरे करणारी जलपातळी नंतर पटकन वाढते.
खरंतर ग्रीष्म ऋतूची तप्तता सहवत नाही तरी घराबाहेर पडल्याविना करमतही नाही, जमतही नाही, अशी अवस्था झाली होती. उष्ण झळांना कसं पेलायचं हा विचार घामाच्या धाराही सांगू शकत नव्हत्या. मग काय, डोळ्यांवर गॉगल, डोक्याला सुती स्कार्फ आणि सोबत पाण्याची बाटली घेऊनच प्रस्थान!
यावर्षी अधिक महिना नेमका ‘ज्येष्ठ’. गोंदवल्याला जपयात्रेच्या निमित्ताने निघालो. अर्थात चारचाकी वाहनातून आणि पुरते ५१जण! गर्मी सुसह्य झाली. थकवा न येता दिवसभराचा प्रवास पार पडला. मुखीचा रामनाम जप आणि ऋतू ग्रीष्माचं सहकार्य लाभलं होतं. कसं ते सांगते. वाटलं होतं १७० किलोमीटरचा जाण्याचा, तितकाच येण्याचा हा मार्ग कसा क्रमण करायचा? पण वसंताची कोवळी लुसलुशीत पालवी आता या उन्हाला सरावली होती. पांढरा चाफा, कडुलिंब, आम्रतरू, सागवान, सोन मोहोर, चिकू इत्यादी वृक्षांची पानं आता मोठाली झाली होती. मधूनच केळीच्या बारमाही उत्पन्न देणाऱ्या बागाही दोन्ही हात पसरून उभ्या दिसल्या. वटवृक्ष नेहमीच गारवा देतो; परंतु पिंपळ वृक्षही आता बदामी पानांतून झुलत होता. केशरी गुलमोहराची फुलं काही अंशी अवनीवर पायघड्या घालीत होती. इकडे पर्णसंभार आपली कात टाकून ताजातवाना... बहाव्याच्या झुंबरांची रयाच गेली होती. ओळखू येणार नाही इतक्या शिताफीनं पानांची गर्दी वृक्षावर! गंमत म्हणजे दुहेरी वाहतुकीच्या मार्गावर मधे शासनानं प्रवाशांसाठी नेत्रसुखद वृक्ष-वेलींची निगा राखलीच आहे. विविध रंगांत फुललेल्या बोगनवेली हमखास लक्ष वेधून घेत होत्या. मधूनच कण्हेर, मधुमालतीही हवेच्या झोतांशी खेळत होत्या. दूरवर सह्याद्रीच्या डोंगररांगांपर्यंत नजर जा-ये करीत होती. कुठे मक्याची शेती, कुठे उसाची लागवड हिरव्या तोऱ्यात सलाम करीत होती. कुठे नांगरलेली काळी माती पाऊसधारांच्या प्रतिक्षेमध्ये थांबलेली! मधेच शेतात भाजावण चाललेली. धुराचे लोट आकाशापर्यंत पोहोचलेले. शेतीसाठी आवश्यक कर्म आमच्या वाटेत मात्र अडथळा आणीत नव्हतं.