पाचवी आणि आठवीच्या परीक्षा

पुन्हा संधी देऊनही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गात बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
school
school sakal

इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याच्या धोरणामध्ये बदल करत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच पाचवी आणि आठवीमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याचा आणि पुन्हा संधी देऊनही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गात बसविण्याचा निर्णय घेतला आहे...

फक्त विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्याचा निर्णय न घेता संपूर्ण शिक्षण पद्धती किंवा शिक्षण प्रक्रियाच कशी प्रभावी होईल, विद्यार्थ्यांना यशाकडे कशी घेऊन जाईल याचा विचार करत अभ्यासाबरोबर अभ्यास-सवयी, अभ्यास-पद्धती, अभ्यासतंत्र हेही विद्यार्थ्यांना शिकवले तर पास-नापासचा प्रश्नच निर्माण होणार नाही.

इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याच्या धोरणामध्ये बदल करत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच पाचवी आणि आठवीमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याचा आणि पुन्हा संधी देऊनही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गात बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने इयत्ता आठवीपर्यंतची विद्यार्थ्यांची ढकलगाडी आता सुरू झालेल्या या शैक्षणिक वर्षापासून थांबणार आहे.

नव्या निर्णयानुसार इयत्ता पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी इयत्ता चौथीपर्यंत अनुत्तीर्ण न होता पुढे सरकत राहील, पण पाचवीतून सहावीत जाताना मात्र त्याला/ तिला परीक्षेला सामोरे जावे लागेल. या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील ते सहावीत जातील. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील त्यांची एक महिन्यानी पुनर्परीक्षा घेतली जाईल. त्यातही उत्तीर्ण न होणारे विद्यार्थी पाचवीतच राहतील. हीच प्रक्रिया इयत्ता आठवीतून नववीत जातानाही होईल.

शासनाचा हा निर्णय आणि त्याचे संभाव्य परिणाम यांवर सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. या चर्चांमध्ये न शिरता शैक्षणिक दृष्टिकोनातून या निर्णयाचा विचार केल्यास काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार आपल्याला प्रथमतः करावा लागेल. प्रामुख्याने हा विचार करण्यासाठी शिक्षक आणि पालक हा घटक महत्त्वाचा आहे.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

सध्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धत सुरू आहे. ती प्रथमतः समजून घेणे आवश्यक आहे. पुढील पानावरील तक्त्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्याचा अंदाज येईल.

या मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास केल्यास असे जाणवते, की आकारिक मूल्यमापन ही वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. त्याला आपण अंतर्गत मूल्यमापन म्हणतो. यासाठी कुठलीही परीक्षा घेण्याची गरज नाही. संकलित मूल्यमापनामध्ये प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र अशा दोन लेखी परीक्षा होतात आणि त्या लेखी परीक्षेवरून गुण दिले जातात.

त्याचे पर्सेंटेज तक्त्यांमध्ये दिलेले आहे. आता या मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास केला तर प्रत्यक्षात वर्षभर केलेल्या कामामधून किंवा आकारिक मूल्यमापनांमधूनच विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकतो. लेखी परीक्षेच्या गुणांवर तो पास होतोय का नापास होतोय हे अवलंबून नाही, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे लेखी परीक्षेचा विद्यार्थ्याच्या पास-नापाससाठी तसा फारसा संबंध येत नाही, हे दिसून येत आहे.

school
Solapur Rain News : पंढरपुरात पावसाची चौथ्या दिवशीही हजेरी; ११२ मिलिमीटर पावसाची नोंद

तरीसुद्धा शासनाने परीक्षांचा विचार मांडलेला असल्याने आपल्याला लेखी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना उत्तम मार्क कसे मिळतील त्याविषयी प्रयत्न करण्याची गरज आहे. हे प्रयत्न शिक्षक आणि पालक या दोघांनी मिळून करायचे आहेत.

कोरोनानंतरची स्थिती

२०१९, २०२० ही दोन पूर्ण वर्षे आणि २०२१च्या जवळजवळ अर्ध्या काळात कोरोनामुळे शिक्षणाची प्रक्रिया जवळपास ठप्प झालेली होती. शाळा बंद होत्या, परंतु ऑनलाइन शिक्षण सुरू होते. ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा होत्या. शिकण्यासाठी शैक्षणिक वातावरण हवे असते, कृती हवी असते, संवाद हवा असतो, वाचन हवे असते, लेखन हवे असते, गणन हवे असते.

या सर्व प्रक्रिया ऑनलाइन शिक्षणादरम्यान शिक्षकांची इच्छा असूनसुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत पूर्णाशांने पोहोचवता आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी वाचन, लेखन आणि गणितातल्या मूलभूत प्रक्रिया यामध्ये अप्रगत राहिले. ‘असर’चा अहवाल आपल्याला हेच सांगतो. इयत्ता पाचवीत वाचनावर प्रभुत्व असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण फक्त २१ टक्के आहे. त्याचप्रमाणे गणितावर प्रभुत्व असण्याचे प्रमाण २६ ते २७ टक्के आहे.

इयत्ता आठवीच्या बाबतीतही यामध्ये फारसा फरक नाही. तिथे ते साधारणतः ४० टक्क्यांपर्यंत आहे. इंग्रजीच्या बाबतीत तर अत्यंत दयनीय अवस्था आहे. त्यामुळे आज शिक्षकांवर ही प्रमुख जबाबदारी आहे. विद्यार्थी जर प्रगत करावयाचे असतील तर त्यांना आपल्याला वाचन आणि लेखन या दोन गोष्टी कशा शिकवता येतील त्याचा विचार करायला पाहिजे.

मला असे वाटते, शिक्षकांनी आपल्याला दिलेल्या वेळापत्रकातील तासिकांमध्ये दोन तासिका वाचनासाठी, दोन तासिका लेखनासाठी आणि दोन तासिका पाठ्यपुस्तकातील धडे शिकवण्यासाठी जर वापरल्या तर विद्यार्थी या मूलभूत क्षमतांमध्ये प्रगत होतील.

गणिताच्या बाबतीतसुद्धा गणित शिक्षकांनी त्यांच्या आठ तासिकांपैकी चार तासिका विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रक्रिया म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, चिन्हांकित संख्या, पाढे पाठ करणे, तोंडी गणिते सोडवणे यावर खर्च केल्या तर विद्यार्थ्यांना गणिताची आवड निर्माण होईल आणि विद्यार्थी संकलित मूल्यमापनामध्ये म्हणजेच लेखी परीक्षेमध्ये गणितात चांगले गुण मिळवतील. पालकांनीही याबाबतीमध्ये संवेदनशील राहून आपल्या पाल्याला या अनुभूती कशा देता येतील त्याचा विचार केला पाहिजे.

school
Solapur News: सोलापूर जिल्ह्यात पावणेतीन लाख बेरोजगार, गुरुवारी नॉर्थकोट येथे होणार रोजगार मेळावा

वाचन

सध्या एकंदरच वाचनाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे, असा अनुभव आहे. शालेय विद्यार्थी तर पाठ्यपुस्तकाशिवाय इतर काहीही वाचत नाहीत. पालक आणि शिक्षकही त्यांना इतर वाचनासाठी फारसे प्रोत्साहन देत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे मुलांचा चौफेर विकास होण्याची प्रक्रिया दिवसेंदिवस आक्रसत चाललेली आहे. पुस्तक हातात धरून वाचलेली गोष्ट आपल्या हृदयापर्यंत जाते, त्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी समृद्ध होण्यासाठी होतो, हे संशोधनाने सिद्ध झालेले आहे.

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उत्तम सोडवायची असेल तर अवांतर वाचनाची निश्चितपणे मदत होईल. विशेषतः आज शाळांमध्ये उपयोजित लेखन हा प्रकार आलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःचे मत, स्वतःचे अनुभव, स्वतःच्या कल्पना, स्वतःचे विचार मांडायचे असतात. आपले विद्यार्थी यामध्ये कमी पडतात त्यामुळे त्यांना भाषा विषयात मार्क मिळत नाहीत. पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांमध्ये उत्तम मार्क मिळवायचे असतील तर त्यांच्यात अवांतर वाचनाची गोडी निर्माण केली पाहिजे.

अवांतर वाचनाने त्यांचे भाषा कौशल्य वाढते, शब्दसंग्रह वाढतो, वेगळा विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते ज्याला आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो ती सगळी अवांतर वाचनाने मिळतात. पालकांनी जर याकडे लक्ष दिले तर विद्यार्थी आपोआप परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवतील.

लेखन

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना लेखनाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांची लेखन क्षमता अत्यंत कमकुवत झालेली आहे. परीक्षेमध्ये उत्तर पत्रिकेमध्ये उत्तर लिहिले तरच मार्क मिळणार आहेत. पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा अडसर हा आहे. पुनर्परीक्षा घेऊनसुद्धा विद्यार्थ्यांचे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण मोठे आहे, त्याचे कारण त्यांनी उत्तरे लिहिलेलीच नसतात.

लिहिलेल्या उत्तरांचे लेखनसुद्धा अत्यंत खराब असते. हस्ताक्षर खराब आहे, शुद्धलेखनाचा गंध नाही, अक्षरे समजत नाहीत, विद्यार्थ्यांना लेखनाची कोणतीच तत्त्वे माहीत नाहीत हे जाणवते. शाळेमध्ये शिक्षकांनी जर विद्यार्थ्यांना रोज लेखन करायला लावले, तर हा प्रश्न सुटू शकतो.

पालकांनीही घरी विद्यार्थ्यांना स्वतंत्र वही देऊन रोज दहा ओळी मराठीच्या, दहा ओळी इंग्रजीच्या, दहा ओळी हिंदीच्या लिहायला सांगितल्या आणि त्या रोजच्या रोज तपासल्या किंवा पाहिल्या तरीसुद्धा विद्यार्थ्यांची लेखन क्षमता विकसित होईल. नुसत्या परीक्षेवरून पास-नापासचा निर्णय घेण्यापेक्षा शाळेत शिक्षकांकडून आणि घरी पालकांकडून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ कशी होईल याविषयी शासनानेही प्रयत्न करण्याची गरज आहे.

school
Pune News : वीज बचतीची सुरवात सिंहगड रस्त्यावरून

गणन

गणित हा सर्व विषयांचा पाया आहे. ज्या विद्यार्थ्यांचे गणित उत्तम त्या विद्यार्थ्याला सर्व विषय सोपे जातात, असा अनुभव सर्व शाळांतील शिक्षकांना आलेला आहे. परंतु विद्यार्थी गणितामध्येच खूप कच्चे आहेत. परीक्षेमध्ये नापास होण्याचे प्रमाण आजही गणितामध्ये जास्त आहे. कोविडच्या काळात तर गणितातले संबोध अनेक विद्यार्थ्यांना समजलेले नाहीत.

पायाभूत गणित संबोध न समजता हे विद्यार्थी ढकलगाडीत नंबर आलेले आहेत, त्यामुळे पाचवी किंवा आठवीमध्ये ते उत्तीर्ण होतीलच याची खात्री नाही. आपल्याला शैक्षणिक प्रक्रियेमध्ये याचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. गणितातल्या मूलभूत संकल्पनांचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा लागेल.

पायाभूत अभ्यासक्रम तयार करून शासनाने काही प्रमाणात तसा प्रयत्न सुरू केलेला आहे. परंतु त्याची कार्यवाही कशी होत आहे, याकडे लक्ष नसल्याने प्रयत्न करूनही आपल्यासमोर अपयशच येत आहे. ते का येत आहे, याचे संशोधन करून शासनाने त्याबाबतीत अधिक लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षकांचे शिकवणे चुकते आहे का? विद्यार्थ्यांना सराव कमी पडतोय का? अभ्यासक्रम बोजड आहे का? विद्यार्थ्यांना शिकायचेच नाहीये का? पालकांचे अज्ञान कारणीभूत आहे का? शिक्षकांचे प्रशिक्षण कमी पडते आहे का? इन्स्पेक्शन कमी पडतेय का? या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर यावर काहीतरी उपाय निघू शकेल.

परीक्षेवरून विद्यार्थी पास होतोय का नापास होतोय हे महत्त्वाचे नाहीये, तर विद्यार्थ्यांना शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. शाळेमध्ये होणारे अध्ययन-अध्यापन, शाळेमध्ये होणारे उपक्रम, विद्यार्थी लिहीत असलेले स्वाध्याय हे कितपत प्रभावी पद्धतीने होत आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मनुष्यबळ जर प्रभावी झाले तर विद्यार्थी निश्चितपणे उत्तम शिकतील, त्यासाठी परीक्षा हा अडसर ठरणार नाही हे शिक्षणामधले तत्त्व संपूर्ण जगामध्ये सिद्ध झालेलं आहे.

स्वयंअध्ययन

कोणत्याही परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी स्वअभ्यास किंवा स्वयंअध्ययन हे तंत्र प्रत्येकाला अवगत असलेच पाहिजे. शालेय वयापासूनच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लावली पाहिजे आणि पालकांनी त्याचा सराव घरी करून घेतला पाहिजे. स्वअभ्यास म्हणजे काय, त्यासाठी चार टप्पे अत्यंत महत्त्वाचे आहेत.

एक, वाचन. दोन, लेखन. तीन, व्यक्त करणे आणि चार, चर्चा करणे. शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना धडा शिकवण्याऐवजी धडा कसा शिकावा याचे मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील धडे वाचावेत. वाचलेल्या धड्यावर स्वतः नोट्स काढाव्यात.

आपण काढलेल्या नोट्सवर शिक्षकांशी, आई-बाबांशी, आपल्या मित्रांशी चर्चा करावी आणि या पद्धतीमधून ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत त्या परीक्षेत उत्तरपत्रिकेमध्ये व्यक्त कराव्यात, ही अभ्यासाची किंवा स्वयंअध्ययनाची पद्धत आहे. परीक्षेवरून जर आपल्याला विद्यार्थी उत्तीर्ण करायचे असतील तर अभ्यासाबरोबर ही अभ्यास तंत्रेही शालेय शिक्षणामधूनच विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होण्याची गरज आहे.

school
Pune Traffic : सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी; एकेरी वाहतूक करण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष...

नुसता विद्यार्थ्यांना नापास करण्याचा निर्णय न घेता संपूर्ण शिक्षण पद्धती किंवा शिक्षण प्रक्रियाच कशी प्रभावी होईल, विद्यार्थ्यांना यशाकडे कशी घेऊन जाईल याचा विचार करत अभ्यासाबरोबर अभ्यास-सवयी, अभ्यास-पद्धती, अभ्यासतंत्र हेही विद्यार्थ्यांना शिकवले तर पास-नापासचा प्रश्नच निर्माण होणार नाही.

उपचारात्मक अध्यापन

शासनाच्या नियमानुसार जे विद्यार्थी परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत त्यांची पुनर्परीक्षा घेऊन ते विद्यार्थीही वरच्या इयत्तेत जातील यासाठी प्रयत्न करावेत, असे सुचवलेले आहे. पुनर्परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जे संबोध समजलेले नाहीत ते मे महिन्याच्या सुट्टीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुन्हा शिकवणे अपेक्षित आहे. याला उपचारात्मक अध्यापन असे म्हणतात उपचारात्मक अध्यापनामध्ये सर्वच अभ्यासक्रम पुन्हा शिकवण्याची गरज नाही.

विद्यार्थी ज्या विषयात अनुत्तीर्ण झालेला आहे त्या विषयातील मूलभूत गोष्टी शिकवाव्यात तसेच विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव घ्यावा असे अपेक्षित आहे.

विद्यार्थ्यांचे लेखन

लेखनाच्या बाबतीत शिक्षक अधिक जागरूक असले पाहिजेत. उपचारात्मक अध्यापन ही प्रक्रिया रोज कमीत कमी चार तास तरी होण्याची आवश्यकता आहे. उपचारात्मक अध्यापनामध्ये शिक्षकांनी सरावासाठी पालकांचे सहकार्य घेणे किंवा पालकांना या प्रक्रियेमध्ये सामावून घेणेही अपेक्षित आहे. उपचारात्मक अध्यापनामुळे विद्यार्थी अप्रगत राहत नाहीत.

कोरोनाची साथ सुरू होऊन शाळा बंद झाल्या तेव्हा म्हणजे २०१९-२० या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत असणारा विद्यार्थी आज पाचव्या इयत्तेत आहे. यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षणावर परिणाम झाले आहेत, असे दर्शविणाऱ्या अभ्यासांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची एकूण शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळा आणि घर या दोन्ही पातळ्यांवर प्रयत्न आवश्यक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com