

मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर
प्राजक्तामुळे भारतीला एक नवीन मैत्रीणच मिळाली. संध्याकाळी प्राजक्ता शिबिराहून घरी आली, की दोघींच्या गप्पा रंगायच्या. बरेचदा भारतीच बोलत राही, प्राजक्ता उत्सुकतेनं ऐकत राही. अधूनमधून उदयही गप्पा मारायला येऊन बसत असे. तिघांचं अगदी छान जमलं होतं. पण यामुळे चैतालीची जागा प्राजक्तानं घेतल्यासारखंही भारतीला वाटत राहिलं. तिनं तसं बोलूनही दाखवलं...
चैतालीनं, ‘‘किती वेळा फोन करतेस? तुला माहिती आहे ना आई, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. नको ना जीव खाऊस माझा,’’ असं म्हणत फोन खाड्कन बंदच केला. रात्रीचे ११ वाजून गेले होते. आता डोळा लागणं कठीण होतं. इतक्या वेळा सांगूनही वेळेचं भान कसं सुटतं आईचं! आलं मनात की केला फोन. स्टुपिड... ती मनातल्या मनात पुटपुटली, पण आईला मनातल्या मनातही स्टुपिड म्हटल्याची तिला लाज वाटली. तेवढ्यात खुद्कन हसूही आलं, कारण आईनं ऐकलं असतं तर ‘आधी मूर्ख म्हण, मराठीच बोलायचं,’ असं बजावून मग तिनं असा शब्द वापरल्याबद्दल बडबड केली असती. चैतालीचं मन थोडं शांत झालं खरं, पण एकूणच जे झालं होतं त्यामुळे ती संभ्रमात पडली होती. आईनंच अट्टाहासानं बाबांशी भांडून तिला नरवणसारख्या छोट्याशा गावातून शिक्षणासाठी बाहेर पाठवलं, झेप घ्यायचं बळ दिलं आणि आता उडण्यावरच बंधनं घालू पाहत आहे ती. नरवणहून रागारागानं ती हैदराबादला निघून आली त्या प्रसंगाकडे ओढली गेली.
हैदराबादला जायच्या आधीच्या रात्री चैतालीनं भारती आणि उदयला धक्काच दिला होता.
‘‘अगं, अचानक स्वतःच ठरवून कसं टाकलंस तू? काहीतरी कल्पना द्यायचीस ना आधी!’’ भारतीनं चैतालीवर तोफच डागली. उदय मुळातच शांत स्वभावाचा. तो दोघींचा वाद ऐकत होता. त्याचं लक्ष तरी आहे का, असा प्रश्न भारतीला पडला.
‘‘अहो, तुम्ही ऐकलंत का हिच्या डोक्यातलं खूळ?’’ भारतीनं आपला मोर्चा उदयकडे वळवला.
‘‘खूळ? फायटर पायलट होणं हे खूळ? फायटर पायलट म्हणजे लढाऊ विमानाची वैमानिक. माहीत आहे का?’’ चैतालीला आईचा भयकंर राग आला होता. पण त्याही परिस्थितीत तिनं मराठी वापरायचं लक्षात ठेवलं होतं.
‘‘आई आहे ती. नुसतं वैमानिक व्हायचं ठरवलं असतंस तरी तिनं विरोध केला असता. इथं तर तू लढाऊ विमानाची वैमानिक व्हायचं म्हणत आहेस,’’ उदय किंचिंत हसून म्हणाला.
‘‘तुम्हीही आईची बाजू घेऊ नका!’’
‘‘तुझ्या आईला काय वाटतंय ते तुला सांगायचा प्रयत्न करतोय. बाजूबिजू काय त्यात?’’ उदयही मगापासून चाललेल्या दोघींच्या वादाला वैतागला होता.
‘‘पण बाबा तुमचं काय? तुम्हाला काय वाटतंय ते सांगा ना!’’ चैतालीही आता हट्टालाच पेटली.
‘‘तुझ्या आईच्याच मताचा आहे मी. तुला शिकायलाही आईमुळेच बाहेर पाठवायला तयार झालो ना!’’
‘‘तेव्हाच ठेवायचं होतं ना घरात डांबून! म्हणजे मी स्वतःचे निर्णय स्वतः घेतलेच नसते!’’ चैतालीच्या तोंडून लाह्या फुटत होत्या. कोणीच कोणाचं ऐकून घेत नव्हतं. उदय एकदम चिडला.
‘‘पुरे झाला हा विषय. लगेच जात नाहीयेस ना विमान उडवायला? पुढच्या वेळी येशील तेव्हा बोलू. सकाळी लवकर निघायचं आहे ना तुला? झोपा मग दोघीही.’’ दोघींना एक शब्दही पुढं बोलू न देता तो उठला. नाईलाजानं दोघी गप्प झाल्या.
हैदराबादला पोहोचल्यानंतर चैतालीनं फक्त आपण पोहोचल्याचं घरी कळवलं होतं, तेही फक्त उदयला. भारती तिला रोज फोन करत होती. कधी ती ते घेत होती, तर कधी नाही. चैतालीला तिच्याशी बोलायचंच नव्हतं. आई-बाबांच्या संकुचित विचारांमुळे आपला निर्णय डळमळीत होतो आहे की काय, असं हळूहळू तिलाच वाटायला लागलं होतं आणि दोघांची प्रचंड चीड यायला लागली होती. बाबाच्या स्वभावाप्रमाणं तो तिला विचार करायला वेळ देईल हे तिला ठाऊक होतं, पण आईचा फोन आणि तिच्या निर्णयाबद्दलचे तिचे हजार प्रश्न व उत्तरं आणि त्यांना फोडलेले फाटे या सगळ्यालाच ती वैतागली होती. नरवणहून येऊन तिला एव्हाना महिना होऊन गेला होता. दिवसभर नोकरी आणि त्यानंतर एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्टचा अभ्यास. आईच्या प्रश्नांना उत्तरं देता देता तिलाच प्रश्न पडायला लागले होते. आणि त्या प्रश्नांची तिलाच समाधानकारक उत्तरं मिळत नव्हती, त्यामुळे भारतीच्या विरोधाला ती इरेला पेटल्यासारखी तोंड देत होती आणि थकून जात होती. अखेर आईशी बोलणंच नको, म्हणजे प्रश्नच मिटला, असं स्वतःला बजावत तिनं आईचा फोन उचलणंच बंद केलं. तिला वाटलं होतं आपलं मन शांत होईल, पण आईनं उपस्थित केलेले प्रश्न तिच्याही मनात फेर धरू लागले होते. तिची तिलाच समाधानकारक उत्तरं मिळेनाशी झाली, मन साशंक झालं आणि ती आईवर संतापली. एकदा तिरमिरीत तिनंच फोन लावला आणि आईनं काही बोलायच्या आधीच तिनं आईवर हल्लाबोल सुरू केला...
‘‘किती वेळा फोन करतेस? तुला माहिती आहे ना आई, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. नको ना जीव खाऊस माझा!’’ चैताली तारस्वरात ओरडली. गडबडून भारतीनं तिच्यासमोर बसलेल्या प्राजक्ताकडे बघितलं. घ्यायलाच नको होता का फोन? तिला क्षणभर वाटून गेलं. पण चैताली हैदराबादला गेल्यापासून रोज भारतीच चैतालीला फोन करत होती. तिच्या मनातले प्रश्न विचारत होती. कधी चैताली नीट उत्तरं देत होती, तर कधी फार तुटक, अपमानस्पद बोलत होती. आज अचानक तिचा फोन आला तेव्हा समोर प्राजक्ता बसलेली असूनही तो घेण्याचा मोह भारतीला आवरता आला नाही. कुठून या प्राजक्ताला दोन आठवडे ठेवायची तयारी दर्शवली, असंही क्षणभर वाटून गेलं भारतीला. चैतालीलाही नेमका आजच मुहूर्त मिळाला फोन करायला. केलाच होता तिनं फोन तर सोक्षमोक्ष लावून टाकता आला असता. पण ही मुलगी घरात. तिला उदयचाही राग आला. त्याच्या मित्राची मुलगी; आडगावात कसलंसं शिबिर घ्यायला येणार, तर राहू दे आमच्याकडे म्हणून परस्पर कबूल करून टाकलं होतं त्यानं मित्राला. चैतालीचा आरडाओरडा थांबत नाही हे बघून तिनं फोन एकदम बंदच केला. थरथरत्या देहानं, डबडबलेल्या डोळ्यांनी ती प्राजक्ताकडे बघत राहिली.
‘‘कोण होतं?’’ प्राजक्तानं सहानुभूतीनं विचारलं.
‘‘मुलगी माझी,’’ भारती शरमून म्हणाली.
‘‘तुम्हाला बोलायचं आहे का तिच्याशी? मी पाहिजे तर बाहेर चक्कर मारून येते.’’
‘‘नाही, नाही. ती घेणार नाही माझा फोन. ऐकू गेलंच ना तुलाही?’’
प्राजक्तानं नुसतीच मान डोलावली. दोघी अवघडल्यासारख्या नजरा चुकवत एकमेकींसमोर बसून राहिल्या. मांडीवर चादर ओढून घेण्यासाठी भारतीनं बाजूलाच ठेवलेली चादर घ्यायला हात पुढं केला आणि ती कळवळली. प्राजक्तानं चमकून तिच्याकडे पाहिलं.
‘‘खांदा आणि हात गं. कळ येते एकदम. जुनं दुखणं आहे.’’ खांद्यावर बोटांनी दाब देत भारती अचानक बोलत सुटली.
‘‘राग धरून बसली आहे चैताली. तिला लढाऊ वैमानिक व्हायचंय. त्याला आम्ही विरोध करतोय म्हणून चिडली आहे ती आमच्यावर.’’
‘‘अरे वा! देशसेवाच की!’’ प्राजक्ता कौतुकानं म्हणाली. भारतीला उगाचंच अपराधी वाटलं.
‘‘ते खरं, पण भीती वाटते गं. एकुलती एक आहे.’’ प्राजक्तानं तिची मनःस्थिती समजल्यासारखी मान हलवली.
‘‘तिनं आम्हा दोघांना अचानक सांगितलं आणि वादच सुरू झाला. तिनं कधी ठरवलं, तिच्या डोक्यात आलं कसं, किती वर्षं लागतात, त्यासाठी काय करावं लागतं, असे खूप प्रश्न पडले आहेत. तिला विचारायला फोन केला की हिची गाडी दुसरीकडेच वळते.’’
‘‘म्हणजे काय होतं?’’
‘‘तिचं म्हणणं आहे, की मीच तिला प्रोत्साहन दिलं शिकायला आणि स्वतंत्र निर्णय घ्यायला. कुठं आडकाठी केली नाही. तिच्या बाबांचा विरोध होता कॉलेजसाठी बाहेर ठेवायला. गावातल्या कॉलेजमध्येच जाऊ दे म्हणत होते ते. पण मी ठाम राहिले आणि आता मीच तिच्या निर्णयाला का विरोध करतेय ते तिला कळत नाहीये म्हणे.’’
‘‘हं...’’ प्राजक्ता हुंकारली.
‘‘तुला सांगू प्राजक्ता, माझं लग्न फार लवकर लावून दिलं माझ्या आई-वडिलांनी. बारावी झाली आणि लगेचच लग्नही. इतकी वर्षं त्या गोष्टीचं फार काही वाटलं नाही. पण आता जग जवळ आल्यानंतर गेली काही वर्षं पुन्हा सगळ्यांच्या संपर्कात आले आहे. माझ्या त्यावेळच्या मैत्रिणी कुठल्या कुठं जाऊन पोहोचलेल्या दिसतात ना तेव्हा फार वाईट वाटतं गं मी शिकले नाही, पुढे काहीच केलं नाही याचं. कदाचित ते आधीपासूनच असेल माझ्या मनात, त्यामुळे चैतालीला जे पाहिजे ते करू दिलं मी. तिच्या शिक्षणासाठी तर मागेच लागले. इंजिनिअर झाली ती गेल्यावर्षी. आता तिच्यासारखाच नवरा शोधेल, परदेशात जाईल, भरपूर पैसे कमवेल अशी स्वप्नं पाहत होते, तर हे अचानक डोक्यात शिरलंय तिच्या. सुट्टीसाठी म्हणून आली आणि निघायच्या आदल्या दिवशी सांगितलं. झाली मग खडाजंगी! म्हणून फोन करते तर उचलत नाही. सतत एकच मुद्दा लावून धरते. मी तिला स्वतंत्र निर्णय घ्यायला का शिकवलं म्हणून...’’
‘‘आत्तापर्यंत तिला जे करायचं ते सहज करता आलं, त्यामुळे हा विरोध तिला सहन होत नसेल.’’ प्राजक्ता काहीतरी बोलायचं म्हणून बोलली.
‘‘असंच मलाही वाटलं होतं, पण काय सुरू आहे तिच्या मनात ठाऊक नाही. वैमानिक होण्यावरून वाद झाला, पण ते सोडून सतत मी तिच्याबाबतीत कशी चुकत गेले तेच सांगते. दरवेळी काहीतरी जुनं उकरून काढते. त्या त्या वेळी योग्य वाटले ते निर्णय घेतले आम्ही.’’
‘‘काकांनाही असंच बोलते ती?’’
‘‘हो, ते नाही घेत मनावर, पण तिला वाट्टेल ते बोलूही देत नाहीत. मलाही ते तेच सांगतात. मी ऐकून घेते म्हणून ती उठसूठ बोल लावत राहते, असं त्यांचं म्हणणं आहे.’’
प्राजक्तानं हळूच तिच्या खांद्यावर थोपटलं आणि भारतीच्या मनातली खदखद, अस्वस्थता, घुसमट बाहेर पडली. ती बोलत राहिली, स्वतःचं आख्खं आयुष्यच प्राजक्तासमोर उलगडत राहिली. प्राजक्ताही शांतपणे तिचं बोलणं ऐकत राहिली, काहीबाही सुचवत राहिली. दोघी कितीतरी वेळ बोलत राहिल्या. मधेच उठून प्राजक्तानं कॉफी केली. तेवढ्यानंही भारती सुखावली, ‘‘आयती कॉफी मिळण्याचं सुखही किती दिवसांनी मिळतंय!’’
‘‘काकांना करायला सांगायची की कॉफी...’’ प्राजक्तानं हसून म्हटलं.
‘‘ते करतात गं. पण कधीतरी कोण्या तिसऱ्यानं करणंही छान वाटतं!’’ कॉफीचे घोट घेत भारती पुन्हा आठवेल ते सांगत राहिली.
प्राजक्तामुळे भारतीला एक नवीन मैत्रीणच मिळाली. संध्याकाळी प्राजक्ता शिबिराहून घरी आली, की दोघींच्या गप्पा रंगायच्या. बरेचदा भारतीच बोलत राही, प्राजक्ता उत्सुकतेनं ऐकत राही. अधूनमधून उदयही गप्पा मारायला येऊन बसत असे. तिघांचं अगदी छान जमलं होतं. पण यामुळे चैतालीची जागा प्राजक्तानं घेतल्यासारखंही भारतीला वाटत राहिलं. तिनं तसं बोलूनही दाखवलं.
‘‘चैताली वाईट नाही गं. पण काय तिचं बिनसलंय तेच कळत नाही.’’
‘‘होईल सगळं नीट मावशी. तू काळजी करू नकोस.’’ एव्हाना प्राजक्ताही भारतीला तुम्हीऐवजी ‘तू’ म्हणू लागली होती.
‘‘जे होईल ते होईल... पण आमच्यातला संवाद पुन्हा सुरू होऊ दे म्हणजे झालं!’’ भारती भावूक होऊन म्हणाली.
बघता बघता प्राजक्ताचा जायचा दिवस उजाडला. उदय प्राजक्ताला स्कूटरवरून बस स्टॅंडवर सोडणार होता. प्राजक्ता नमस्कार करण्यासाठी वाकली. आशीर्वादासाठी प्राजक्ताच्या डोक्यावर ठेवलेला हात भारतीनं अचानक जोरजोरात गोलगोल फिरवला, आणि आनंदानं ओरडायलाच लागली! प्राजक्ता आणि उदय तिच्याकडे आश्चर्यानं बघत राहिले.
‘‘हात दुखायचा थांबला की माझा! थोडा जरी हलवला तरी कळ यायची ना, आज नाही आली.’’ तिच्या आनंदाकडे दोघंही समाधानानं पाहत राहिले.
‘‘येत जा बाळा अशीच कधीही. फार छान वाटलं तुझ्याशी बोलून, मन मोकळं झालं. किती काय काय साचलं होतं. कधी कोणाकडे बोललेच नव्हते मी हे सगळं,’’ प्राजक्ताला जवळ घेत ती म्हणाली. दोघं दिसेनासे होईपर्यंत भारती हात हलवत राहिली.
स्कूटरवरून उतरल्या उतरल्या उदयनं प्राजक्ताच्या हातात पाकीट दिलं. शब्द जुळवत त्यानं प्राजक्ताचे प्रेमानं आभार मानले.
‘‘चैतूच्या निर्णयानं उलथापालथच झाली आमच्या घरात. आम्ही तिघंही ढवळून निघालो. भारतीच्या मनात लवकर लग्न झाल्याची बोच इतक्या खोल रुतलेली होती हे मला इतक्या वर्षांनी कळलं चैतूमुळे. हे सगळं झालं ना त्यामुळे कळलं तेही. तुझ्या बाबांनी कुठून तरी माझी ओळख काढली, ती तुझ्या राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून; पण तू मानसोपचार तज्ज्ञ आहेस म्हटल्यावर नशिबानं सुचलं मला हे. भारती स्वतःहून कधीच मानसोपचार तज्ज्ञाकडे गेली नसती. तुझ्यामुळे भारतीच्या मनातलं सगळं बाहेर पडलं. चैतू काय ठरवेल ते भारती आता स्वीकारेल हे नक्की. तुझ्यामुळे झालं हे. आपलं काका-पुतणीचं नातं असंच राहू दे. इथं शिबिरासाठी आलीस, की आमच्याकडेच येत जा राहायला.’’
‘‘नक्की काका, मी बोलत राहणार आहे मावशीशी फोनवर. तिला आता खरं सांगा. औषधांची गरज भासली तर सांगावं लागेलच. चैतालीलाही गरज आहे माझी. ती तयार झाली तर मावशी आणि चैताली दोघींशीही बोलेन मी.’’
पुढं हसून ती म्हणाली, ‘‘तासाचे पैसे घेते मी हे मात्र लक्षात ठेवा हं. बाबाचे नवे मित्र म्हणून त्यातला फार तर एखादा तास फुकट!’’
‘‘ठेवेन लक्षात!’’ उदयही मनमोकळं हसला. बसमध्ये बसलेल्या प्राजक्ताचा त्यानं निरोप घेतला.
परतीच्या वाटेवर काळोख्या रस्त्यावरून चालताना त्याची नजर आकाशातल्या चांदण्याकडे गेली. काळोखात मार्ग दाखवणाऱ्या दिव्यांसारखं ते चांदणं भासलं उदयला. चैतालीची प्राजक्ताशी गाठ कशी घालून द्यायची आणि भारतीला प्राजक्ता कोण होती हे कसं सांगायचं, हा विचार करत तो घराच्या दिशेनं प्रसन्न चेहऱ्यानं निघाला.
मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनास्थित वेब प्रोग्रॅमर, निर्मात्या,
लेखिका व अनुवादिका आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.