

Caring for Aging Parents
esakal
विद्या हर्डीकर-सप्रे
नैराश्य हा वृद्धत्वाकडे जाणाऱ्या प्रवासातला एक घटक असतो. औदासीन्य, दुःख, तात्पुरतं वाईट वाटणं हे सगळं स्वाभाविक आहे. पण दैनंदिन कामात आणि जीवनात अडथळा आणणारं नैराश्य मात्र योग्य नव्हे. तुमच्या सगळ्या काळज्यांची डॉक्टर योग्य ती दखल घेत आहेत ना, याची वेळोवेळी खात्री करून घ्यावी.
कॅलिफोर्नियामधील आमच्या कंपनीतील भोजनोत्तर दुपारची वेळ. आमचा गट एका महत्त्वाच्या प्रकल्पाचं निवेदन करत होता. अचानक माझी सहकारी मेरी उठली, ‘एस्क्युज मी, माझी आई पडून तिचं हाड मोडलं आहे. डॉक्टरांचा निरोप आहे. मला आत्ता लगेच अॅरिझोनाला जायला पाहिजे. माझ्या भागाचं निवेदन विद्या करेल.’ आणि ती निघाली. विमानतळावर जाऊन मिळेल ते तिकीट घेऊन ती अॅरिझोनाला गेली.
मला क्षणभर माझ्या आईच्या आजारपणाची आठवण झाली. ती आयसीयूमध्ये आहे हे समजताच मीसुद्धा अशीच तातडीनं भारतात आले नव्हते का! दूर राहून आई-वडिलांसाठी धावाधाव करणाऱ्या जगातल्या सर्वच मुलांच्या आठवणी अशाच असतील. त्यातही ते वृद्ध आजारी पडले तर आणखी काळज्या आणि जबाबदाऱ्या! हा अनुभव पहिल्यांदा येतो तेव्हा ‘ऑल यू डोन्ट वॉन्ट टू नो, बट नीड टू नो’ अशी परिस्थिती असते. अशावेळी काही चार अनुभवाच्या गोष्टी समजल्या तर गोंधळून जायला होत नाही. आपण एकटे नाही, असा एक दिलासा मिळतो. एक म्हणजे रुग्णाच्या आजाराबद्दल आणि उपचारपद्धतीबद्दल जितकी जास्त माहिती, तज्ज्ञता मिळवता येईल तितकी मिळवावी. अभ्यास केल्यावर आपल्याला एक विश्वास येतो. वास्तवाची कल्पना येते आणि उपचारांना दिशा मिळते. औषधांचे दुष्परिणामही माहीत असावेत.