

Elderly Care and Caregiver Stress
esakal
विद्या हर्डीकर-सप्रे
आजारात रुग्ण जेव्हा सेवा करणाऱ्या व्यक्तीवर चिडतो, तेव्हा त्याला रागानं प्रत्युत्तर देणं स्वाभाविक आहे. परंतु, अशावेळी सेवा करणाऱ्या व्यक्तीला आपल्या रागावर नियंत्रण ठेवून प्रेमानं सेवा करावी लागते. कोणत्याही परिस्थितीत छळ आणि दुर्लक्ष रुग्णसेवेत खपवून घेतलं जाऊ नये. वृद्ध नवरा-बायकोमध्ये एकाला दुसऱ्याची सेवा करावी लागते, तेव्हा शुश्रूषक थकतो आणि चिडचिड करतो.
‘आज सकाळी मस्त इडली-सांबार करू म्हटलं, तर म्हातारीचा म्हणे श्रावणातला कसला तरी उपवास! काय छळवाद आहे!’ असं
पुटपुटत सुनेनं खिचडीची बशी सासूसमोर दणकन आदळली. ते आदळणं आणि त्यामागची भावना सासूला समजली आणि तिनं एक आवंढा गिळला!
‘अगं, कुठे गेली होतीस उंडारायला? माझी चहाची वेळ होऊन गेली, त्याची काही लाज नाही वाटत?’ सासू कडाडली. आता यात छळवाद कोण कोणाचा करतंय हा कौटुंबिक वादाचा मुद्दा होऊ शकतो. ‘वृद्धांचा छळ’ म्हणजे वृद्धांनी केलेला छळ की वृद्धांचा झालेला छळ? तर दोन्हीही! त्याशिवाय या शब्दांना अनेक छटा आहेत. अनेक कारणं, परिणाम आणि अनेक संदर्भ आहेत. या सगळ्यावर मोठं पुस्तक लिहिता येईल.
सारांश म्हणजे छळवाद झालाच तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या माणसांना धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून विशेषतः वृद्धांच्या सेवेच्या संदर्भात याचा विचार करणं महत्त्वाचं. पुष्कळदा आपण जे करत आहोत ते छळाचं लक्षण आहे, याची माहितीदेखील आपल्याला नसते.