

Elderly Parents Care
esakal
विद्या हर्डीकर-सप्रे
आई-वडिलांच्या बाबतीत सर्व कुटुंबानं एकत्र राहणं महत्त्वाचं असतं. एकविचारानं काही निर्णय घ्यावे लागतात. निवासस्थान सुरक्षा, घरातली अडगळ, स्वच्छता यांपासून ते अनेक लहान-मोठ्या विषयांपर्यंत. फ्रीजमधल्या जुन्या सडक्या गोष्टी हा ‘आई-वडिलांना घरातल्या गोष्टींकडे लक्ष देणं झेपत नाही’ याचा निर्देशांक असतो.
इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे, ‘इट टेक्स अ व्हिलेज’. आपल्याला जीवनात अनेक लोकांची मदत होत असते. कोणाचीही काळजी घेताना (मग ते लहान मूल असो, घरातील रुग्ण असो किंवा आपले विकलांग होणारे आई-वडील असोत) आपल्याला जास्तीची मदत लागत असते. म्हणून शुश्रूषा हे कुणा एकाचं कामच नव्हे, तर त्याला अनेक पदर असतात. मागील लेखात (ता.१९ सप्टेंबर) आपण शुश्रूषा पथक या संकल्पनेचा विचार केला. त्या पथकातील दूरस्थ आणि प्राथमिक शुश्रूषक यांना हातात हात घालून काम करावं लागतं, हे आपण त्यामध्ये पाहिलं.
रुग्णाची कागदपत्रं, त्यांचं वर्गीकरण, रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, पाठपुरावा हे काम दूरस्थ शुश्रूषक करू शकतात. सध्याची कागदपत्रं एकत्र करणं, ती व्यवस्थित लावणं, टिप्पणं काढून ठेवणं, पाठपुरावा करणं हे काम प्राथमिक शुश्रूषक करू शकतात. रुग्णाची बाकीची कागदपत्रं, आर्थिक माहिती, घराची कागदपत्रं आणि अन्य कायदेशीर कागदपत्रं एकत्र करणं, त्यांचं वर्गीकरण करणं आणि टिप्पणं ठेवणं महत्त्वाचं आहे. आणीबाणीच्यावेळी ही माहिती चटकन उपयोगी पडते.