डॉ. बाळ फोंडके
हत्तीची सोंड हा विलक्षण अवयव आहे. इतर कोणत्याही अवयवापेक्षा त्यात जास्त स्नायू असतात. तुलना करायचीच झाली तर ती आपल्या म्हणजे मानवप्राण्याच्या हाताशीच करता येईल. स्नायूंची ही रेलचेलच मजबूत पकडीसाठी उपयोगी पडते. ते करताना या स्नायूंना ज्या घड्या पडतात त्यांचंच प्रतिबिंब सुरकुत्यांमध्ये दिसून येतं.
आपल्या धार्मिक समजुतीनुसार उजव्या सोंडेचा गणपती अधिक कडक मानला जातो. त्याची उपासना करणं भक्तांसाठी फार मोठी कसोटी असते. त्यामुळं घरातली गणपतीची मूर्ती नेहमी डाव्या सोंडेचीच असेल याची काळजी घेतली जाते.
एवढंच कशाला, केवळ दीड दिवसांच्या गणेशोत्सवासाठी आणलेली मूर्तीही डाव्या सोंडेचीच असेल याची दक्षता घेतली जाते. क्वचित एखाद्या देवळातली किंवा वारशानं मिळालेली एखाद्या कुटुंबातली मूर्ती उजव्या सोंडेची असते. तिची पूजाअर्चा करण्यासाठी कडक उपाय योजले जातात.