

emotional Marathi story
esakal
त्याचे आणि आमचे असे काय ऋणानुबंध होते, की त्याची आणि आमची अशी गाठ पडावी? कुठल्या पूर्वजन्मीचं देणं फेडायला तो आला होता कोणास ठाऊक. त्या दिवसानंतर तो समुद्रावर कधीच दिसला नाही. तो कुठून आला, कुठे गेला ते आम्हाला कधीच कळलं नाही. काहीजण क्षणिक भेटतात, पण जन्मभर आठवणीत राहतात. त्याप्रमाणे तो भेटला आणि कायमचं मनात घर करून गेला. जाताना त्याच्या निरपेक्ष मैत्रीतून आयुष्यभर पुरेल असा निखळ आनंद देऊन गेला.
कासवांच्या नेस्टिंगच्या काळात, भरतीच्या वेळांव्यतिरिक्त सकाळ-संध्याकाळ समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालणे हा मोहन सरांबरोबर माझ्याही रुटीनचा भाग होऊन गेला होता. आजही त्याच नेमाने आम्ही किनाऱ्यावर निघालो होतो. बंधारा संपून जिथे पुळण सुरू होते तिथे खाली येण्यासाठी पायऱ्या आहेत. त्या उतरून खाली येत असताना समोर एक कुत्रा आमच्याकडे टक लावून पाहत उभा असलेला दिसला. आम्ही पायऱ्या उतरून वाळूवर पाय ठेवल्याबरोबर तो धावत पुढे आला, जणू आमचीच वाट पाहत होता. मग पुढे येऊन मोहन सरांजवळ गेला आणि आशेने पाहू लागला. मोहन सर प्राणीवेडे, त्यांनी लगेच त्याला जवळ घेतलं, मायेनं गोंजारलं. त्यानेही छान लाड करून घेतले. आता त्यांच्या छान गप्पाही सुरू झाल्या. मी आपली एका बाजूला उभी राहून सारं बघत होते. सर जे जे म्हणत होते, ते ते तो करत होता. मला आश्चर्य वाटलं, घरच्या पाळीव कुत्र्यांना मालकाची सवय झालेली असते, त्याची भाषा समजत असते; पण हा कोण, कुठला, कधी न पाहिलेला कुत्रा अचानक येतो काय आणि सगळं माहीत असल्यासारखा वागतो काय; सारंच अचंबित करणारं होतं.