

Creative summer activities for kids without mobile phones
esakal
मैत्रेयी पंडित-दांडेकर
सुट्टीत मुलांना मोबाईलपासून दूर ठेवत त्यांचा वेळ अर्थपूर्ण गोष्टींमध्ये आणि तेही मजेदारपणे कसा घालवायचा, हा अनेक पालकांसमोरचा प्रश्न असतो. अशा वेळी सोप्या आणि रंगीत क्राफ्ट ॲक्टिव्हिटी हा एक उत्तम पर्याय ठरतो. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे फक्त खेळ नाही, तर काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते. कल्पनाशक्ती वापरून केलेल्या या वस्तू पालक आणि मुले दोघांनाही नवनिर्मितीचा आनंद देतात हे नक्की. हा आनंद तुम्हालाही मिळावा म्हणून मी माझ्या मुलींबरोबर केलेले हे उपक्रम तुम्हीही तुमच्या मुलांबरोबर करून बघा... वस्तू तयार करताना म्हणण्यासाठी कविताही दिल्या आहेत.
साहित्य
दहा-बारा लाकडी क्राफ्ट स्टिक्स/आइस्क्रीम स्टिक्स, विविध रंगांची स्केचपेन्स, छोटे हिरवे-पांढरे-पिवळ्या रंगांचे गोंडे, काळ्या रंगाचा मार्कर पेन, १ हिरवा कार्डस्टॉक पेपर/जाड कागदाचा तुकडा, १ पांढरा कार्डस्टॉक पेपर/जाड कागदाचा तुकडा, सेलोटेप, डिंक, कात्री किंवा कटर.
कृती
आपण वांगं, टोमॅटो, मटार, गाजर, ब्रोकोली, मका आणि फ्लॉवर या भाज्या तयार करणार आहोत. वांगं आणि टोमॅटोसाठी एका क्राफ्ट स्टिकचे कटरच्या मदतीने दोन सामान तुकडे करा. वांग्यासाठी दोन्ही तुकडे जांभळ्या स्केचपेनने रंगवा. दोन्ही जांभळे तुकडे शेजारी ठेवा आणि मागच्या बाजूने सेलोटेपच्या मदतीने चिकटवा. शेवटी हिरव्या जाड कागदाची पानं कापून वांग्याच्या वरच्या बाजूला चिकटवा. तुमचं वांगं तयार! याच पद्धतीने लाल स्केचपेन वापरून टोमॅटो तयार करा.
आता गाजर तयार करण्यासाठी दोन क्राफ्ट स्टिक्स व्ही आकारात डिंकाने चिकटवून घ्या. तिसरी बाजू बंद होईल इतक्या लांबीची क्राफ्ट स्टिक कापून ती चिकटवा आणि त्रिकोण पूर्ण करा. त्रिकोण केशरी रंगाने रंगवून घ्या आणि वरच्या बाजूला हिरव्या रंगाची पाने चिकटवा. गाजर तयार! ब्रोकोली आणि फ्लॉवरसाठी पांढऱ्या कागदाचा तुकडा फुलाच्या आकारात कापून एका क्राफ्ट स्टिकच्या टोकावर चिकटवा. मग पांढऱ्या फुलावर पांढरे गोंडे चिकटवा. याच पद्धतीने हिरवा रंग वापरून ब्रोकोली तयार करा. मटारसाठी दोन क्राफ्ट स्टिक्स हिरव्या रंगाने रंगवून घ्या. आता दोन्ही स्टिक्स शेजारी ठेवा आणि मागच्या बाजूने सेलोटेपच्या मदतीने चिकटवा. तयार झालेल्या मटारच्या शेंगेवर मधोमध हिरवे गोंडे एका ओळीत लावा. मटारची शेंग तयार झाली.
मका तयार करण्यासाठी हिरवा कागद लंबगोलात कापून घ्या. मग त्याच्या एका टोकाला हिरव्या कागदाच्या बारीक पट्ट्या कापून लावा. हे म्हणजे मक्याच्या कणसाचे बाहेरील आवरण. आता लंबगोलापेक्षा थोड्या कमी उंचीची क्राफ्ट स्टिक कापून तिला पिवळा रंग द्या. ही पट्टी लंबगोलावर डिंकाने चिकटवा.
त्यावर मधोमध पिवळे गोंडे एका ओळीत लावा, आणि मक्याचे कणीस तयार!
गदिमांचे शब्द उधार घेऊन हे गाणं म्हणता येईल,
सगळ्या ताज्या भाज्यांची भरली होती सभा
फ्लॉवर होता सभापती मधोमध उभा
फ्लॉवर म्हणाला, फ्लॉवर म्हणाला
‘‘मित्रांनो, देवाघरची लूट देवाघरची लूट
आपल्याइतके श्रेष्ठ नाही कोणतेच फ्रूट.
या भाज्यांचे कराल काय?’’
गाजर म्हणाले ‘‘असे किसीन तसे किसीन,
गोड-गोड मी हलवा बनीन’’
मका म्हणाला ‘‘मीठ, तिखट, लिंबू लावा,
भाजून-भाजून मलाच खावा’’
मटार म्हणाला ‘‘कोवळा असेन तेव्हा,
उसळ बनून जाईन, उसळ बनून जाईन’’
वांग म्हणालं ‘‘नाही रे बाबा,
मटारासारखं माझं मुळीच नाही,
मोठ्ठा झालो की चमचमीत काप होईन,
चमचमीत काप होईन’’
ब्रोकोली म्हणाली ‘‘जेव्हा पडेल थंडी,
माझ्या मुकुटाची मलाच बंडी’’
टोमॅटो म्हणाला ‘‘कधी मोठा कधी लहान,
कधी मोठा कधी लहान,
सॅलड-सारात मी लागतो महान’’
भोपळा म्हणाला ‘‘पोट टम्म फुगवून मी धरीन,
मी धरीन
म्हातारीला बसवून लेकीकडे टुणूक टुणूक पळीन’’
फ्लॉवर म्हणाला ‘‘छान छान
देवाच्या देणगीचा ठेवा मान
आपल्या भाजीचा उपयोग करा’’
‘‘नाहीतर काय होईल?’’
‘‘मैदा साखरेगत,
आपलापण भाव पडून जाईल’’