

English Premier League
esakal
किशोर पेटकर
इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टर सिटी संघाने स्पॅनिश प्रशिक्षक पेप ग्वार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली २०१७-१८पासून सुवर्णकाळ अनुभवला. २०२३-२४पर्यंत त्यांनी एकूण सहा वेळा प्रीमियर लीग किताब पटकावला, त्यापैकी सलग चार वेळा ते विजेते ठरले. मात्र मागील दोन मोसमांत या संघाला अपेक्षित यश मिळाले नाही.
जगभरातील व्यावसायिक फुटबॉलमध्ये इंग्लिश प्रीमियर लीगला सर्वाधिक लक्षवेधी मानले जाते. स्पर्धेच्या ३५व्या मोसमाला गतविजेता आर्सेनल आणि पदोन्नती मिळालेल्या कॉव्हेन्ट्री सिटी या संघातील लढतीने सुरुवात झाली. अपेक्षेनुसार आर्सेनल संघाने एकतर्फी विजयासह मोहिमेस सुरुवात केली. प्रीमियर लीगला सुरुवात होण्यापूर्वी ‘द गनर्स’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या आर्सेनल संघाने मँचेस्टर सिटीला सहज नमवून एफए कम्युनिटी शिल्डवर नाव कोरले होते. पुढील वर्षी ३० मेपर्यंत चालणाऱ्या इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये आर्सेनल संघ निश्चितच विजेतेपदासाठी स्पर्धक असेल, पण वाटचाल सहजसोपी नसेल. मँचेस्टर सिटी, मँचेस्टर युनायटेड, ॲस्टन व्हिला, लिव्हरपूल हे गतवेळचे पहिल्या पाच क्रमांकावरील संघ, तसेच चेल्सी, एव्हरटन हे संघही जेतेपदाच्या शर्यतीत असतील. साहजिकच आर्सेनल संघासमोर खडतर आव्हान असेल. एकूण २० संघांच्या या तुल्यबळ स्पर्धेत कॉव्हेन्ट्री सिटीसह इप्सविच टाऊन, हल सिटी या संघांना पदोन्नती मिळाली आहे, त्यांनाही स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. फ्रँक लँपार्ड यांच्या मार्गदर्शनाखालील कॉव्हेन्ट्री सिटी संघ तब्बल २५ वर्षांनंतर प्रीमियर लीग स्पर्धेत दाखल झाला आहे. नावाजलेला संघ मँचेस्टर युनायटेड २०१२-१३नंतर इंग्लिश प्रीमियर लीग जिंकू शकलेला नाही. ते दीर्घकालीन प्रतीक्षा संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नशील असतील. या संघातून दीर्घकाळ खेळलेले खेळाडू कॅरिक यांच्या मार्गदर्शनाखाली युनायटेडला गतवैभवाची अपेक्षा आहे. एकमात्र खरे, मागील दोन मोसम बघता, या वेळच्या मोसमात नवा विजेता संघ जल्लोष करताना दिसल्यास नवल वाटू नये.