डॉ. आशुतोष जावडेकर
कवितेचा आस्वाद हा खरंतर कुठल्याच गणितात बसत नाही. आपण सुरुवात करायची वाचायला; थोडी मेहनत घ्यायची. मग कविता कधीतरी प्रसन्न होते आणि अर्थ देऊन जाते. कधीकधी तर अर्थ मिळत नाही, पण तरी अपार सुख ती कविता देते.
गेल्या आठवड्यात माझा ठाण्यात कार्यक्रम होता. भरगच्च भरलेलं घाणेकर सभागृह आणि सुरुवातीलाच बोलण्याच्या ओघात बोरकरांच्या कवितेतली एक पंक्ती म्हटली,
उठे फुटे जी जी लाट, तिचा अपूर्वच थाट
फुटे मिटे जी जी वाट, तिचा अद्वितीय घाट!
सावध असलेलं सभागृह एकदम मोकळं होत जोरदार दाद देऊन गेलं आणि मग प्रेक्षक आणि कलाकार हा संवाद सुरू झाला. मी मनात म्हटलं, ही कवितेची ताकद!