

Regional Pickle Recipes
esakal
कमरखाचे लोणचे
कमरख हे आंबट-गोड चवीचे फळ आहे. कोकणात याचे लोणचे पारंपरिक पद्धतीने केले जाते.
साहित्य
पाचशे ग्रॅम कमरख (स्टार फ्रुट), २ चमचे मीठ, अर्धा चमचा हळद, २ चमचे काश्मिरी लाल तिखट, १ चमचा मोहरी, ४ चमचे बडीशेप, अर्धा चमचा भाजून कुटलेले मेथी दाणे, चिमूटभर हिंग, २ चमचे किसलेला गूळ (ऐच्छिक), ४ चमचे तेल (मोहरी किंवा शेंगदाणा).
कृती
कमरख स्वच्छ धुऊन, पुसून त्याचे पातळ काकडीसारखे काप करून घ्यावेत. एका भांड्यात कमरखाचे काप, मीठ आणि हळद घालून तीस मिनिटे ठेवावे. कढईत तेल गरम करून तेल थंड होऊ द्यावे. मग त्यामध्ये मोहरी, कुटलेले मेथीचे दाणे, बडीशेप, हिंग आणि काश्मिरी लाल तिखट घालावे. हा तयार झालेला मसाला कमरखाच्या कापांमध्ये घालून सर्व नीट एकजीव करून घ्यावे. गोडसर चव हवी असल्यास त्यामध्ये गूळ घालावा. तयार लोणचे काचेच्या स्वच्छ कोरड्या बरणीत भरून तीन-चार दिवस कडक उन्हात ठेवावे. हे लोणचे करताना तेल थोडे जास्त वापरल्यास लोणचे वर्षभर टिकू शकते.
खजुराचे लोणचे
खजुराचे लोणचे केरळमधील, विशेषतः मलबार प्रदेशातील एक प्रसिद्ध पदार्थ आहे.
साहित्य
बिया काढून तुकडे केलेले २५० ग्रॅम खजूर, १ चमचा मीठ, २ चमचे काश्मिरी लाल तिखट, अर्धा चमचा भाजलेली जिरे पूड, अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, २ चमचे चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस, २ चमचे किसलेला गूळ (ऐच्छिक), ४ चमचे तेल (मोहरी किंवा शेंगदाणा), १ चमचा आले पेस्ट, १ चमचा लसूण पेस्ट.
कृती
खजुराच्या बिया काढून त्याचे लहान तुकडे करावेत. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यावी. त्यामध्ये आले, लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे. मग चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस, काश्मिरी लाल तिखट, जिरे पूड आणि मीठ, गूळ घालून तेल सुटेपर्यंत हा मसाला परतावा. कढईत खजुराचे तुकडे घालून चांगले मिक्स करून घ्यावे आणि मंद आचेवर एक-दोन मिनिटे शिजवावे. लोणचे थंड झाल्यावर हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावे. लोणचे टिकण्यासाठी त्यात थोडे व्हिनेगर घालू शकता. हे लोणचे जास्त तेलकट नसते आणि पौष्टिकही असते.