

Indian Culture and History
esakal
जवळचे शहर : बदामी
जवळचे विमानतळ : हुबळी विमानतळ
जवळचे रेल्वेस्थानक : बागलकोट
जवळचे बसस्थानक : ऐहोळे
केव्हा जाल? : ऑक्टोबर ते फेब्रुवारी
वारसास्थळाची वैशिष्ट्ये : बदामी शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेला हा मंदिरसमूह. बदामीच्या चालुक्य घराण्याची ही उत्तरकालीन राजधानी होती. प्राचीन काळी किसुव्वोळल किंवा पट्टद किसुव्वोळल या नामांतरांनी ते प्रसिद्ध होते. आपल्या स्थापत्यशैलीचे उत्तम प्रदर्शन व्हावे, या हेतूने चालुक्य राजांनी इ.स. सहाव्या ते आठव्या शतकात नागर आणि द्रविड या दोन्ही वास्तुशैलींनुसार या भागात मंदिरे बांधली. या शैलींच्या मिश्रणातून ‘चालुक्य’ ही स्वतंत्र उपशैली विकसित झाली. यातील नऊ मंदिरे आजही सुस्थितीत आहेत. येथील पापनाथ, जंबुलिंग, काडसिद्धेश्वर व काशीविश्वनाथ ही मंदिरे नागर शैलीत, तर संगमेश्वर, विरुपाक्ष, मल्लिकार्जुन, गलगनाथ, जिनालय ही मंदिरे द्रविड शैलीत बांधलेली आहेत. पापविनाशन व इतर काही भग्न मंदिरे चालुक्य शैलीत बांधलेली आढळतात. येथील विशेष आकर्षण असलेले विरुपाक्ष हे मंदिर राजा दुसऱ्या विक्रमादित्याने आपल्या कांचीपुरम्वरील विजयाच्या स्मरणार्थ, त्रैलोक्यमहादेवी या आपल्या राणीच्या आग्रहाने इ.स. ७४०मध्ये बांधले. या मंदिराच्या वास्तूवरून प्रेरित होऊन गोपुर ही द्रविड मंदिरशैलीतील मुख्य कल्पना उदयास आली, असे म्हटले जाते. लोकेश्वर या भगवान शंकराच्या रूपाला हे मंदिर प्रथम अर्पण केलेले असल्यामुळे लोकेश्वर या नावाने ते प्रथम प्रसिद्ध होते. सूत्रधारी गुंड या वास्तुविशारदाने हे मंदिर राणी त्रैलोक्यमहादेवीच्या लोकमहादेवी या बहिणीसाठी बांधले, असा शिलालेखांत उल्लेख आहे. मंदिर परिसरात कन्नड भाषेत लिहिलेले बारा शिलालेख आहेत. या मंदिरसमूहाच्या बांधणीत लाल-सोनेरी खडकांचा वापर केला गेला. सूर्यास्ताच्यावेळी हा खडक चमकतो आणि मंदिर परिसर अधिकच मोहक दिसतो.