मधुरा खिरे
मध्य आशियातील उझबेकिस्तान हा देश म्हणजे प्राचीन सिल्क रोडवरचं मध्यवर्ती व्यापारी केंद्र. उझबेकिस्तानच्या उत्तरेला व वायव्येला कझाकिस्तान, ईशान्येला किर्गिझस्तान, आग्नेयेला ताजिकिस्तान, दक्षिणेला अफगाणिस्तान व नैऋत्येला तुर्कमेनिस्तान असे देश आहेत. सांस्कृतिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा हा देश पर्यटकांमध्ये कला व स्थापत्यासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या मस्ट व्हिजिट शहरांच्या यादीत ताश्कंद, समरकंद, बुखारा व खिवा ही शहरे मोडतात. याव्यतिरिक्त करकल्पकस्तान, फर्गाणा या जागाही भेट देण्यासारख्या आहेत.
ताश्कंद
ताश्कंद या राजधानीच्या शहरात १९६६मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानं बऱ्याच ऐतिहासिक वास्तूंची पडझड झाली. त्यामुळे आज जे ताश्कंद शहर दिसतं, ते सोव्हिएत युनियननं पुनर्बांधणी केलेलं आधुनिक शहर आहे. ताश्कंदला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी इथलं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे लालबहादूर शास्त्री यांचं स्मारक. ताश्कंदमध्ये ११ जानेवारी १९६६ रोजी शास्त्रीजींचं निधन झालं होतं.