डॉ. आनंद ज. कुलकर्णी
डोमेन नॉलेजबरोबर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे ज्ञान हा एक उत्तम मार्ग आहे. जगात आज कित्येक उद्योग आहेत ज्यांसाठी अशा प्रतिभा असणाऱ्यांची नितांत गरज आहे. प्रत्येकाने या संधीचा लाभ घेण्याच्या दृष्टीने तयारी केली पाहिजे.
कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही संकल्पना आता रोजच्या जीवनात वापरात येऊ लागली आहे. एकीकडे आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे काही क्षेत्रांत रोजगार कमी होण्याची शक्यता असली, तरी कित्येक क्षेत्रांत प्रचंड वेगाने संधी वाढत आहेत व नवनवीन रोजगार उपलब्ध होत आहेत. त्यांचा अर्थव्यवस्था बळकटीसाठी चांगला उपयोग होतो आहे.
प्रामुख्याने मार्केटिंग, सेनादले, शिक्षण, वैद्यकीय सेवा, उत्पादन, हवामान, कृषी, बँकिंग, बांधकाम, औषधनिर्माण इत्यादी क्षेत्रांत संशोधनासंबंधी संधी वाढतील असे चित्र दिसते आहे.
भारतातील कित्येक छोट्या-मोठ्या सॉफ्टवेअर व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपन्या सेवा क्षेत्रात अग्रणी आहेत. त्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व ऑटोमेशन येऊ घ्यातल्यामुळे नोकरीच्या संधी कमी होऊन संशोधनाच्या संधी वाढतील असे चित्र आहे. त्यामुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्समधील संशोधनाच्या दृष्टीने करिअरकडे पाहिले पाहिजे.