भ्रमंती। मंदार व्यास
हिमालयाच्या कुशीतला ट्रेक केवळ ट्रेक कधीच नसतो. ती एक समाधान देणारी आत्मशोधाची प्रक्रिया असते. किन्नौर कैलाशनं आम्हाला श्रद्धेच्या शिखरावर नेलं, आणि युल्ला कांडाने निसर्गाच्या प्रेमळ कुशीत विसावायला शिकवलं. हा ट्रेक फार कोणाला माहिती नाही, चर्चेतही नसतो, पण त्याचं सौंदर्य अवर्णनीय आहे!
हिमाचल प्रदेशातील किन्नौर हा भाग म्हणजे हिमालयाच्या कुशीत विसावलेलं एक अद्भुत नंदनवनच! इथं केवळ पर्वत नाहीत, तर इथं अनुभव आहेत; कठीण चढाईचे, स्वतःच्या मर्यादांवर अतिक्रमण करण्याचे, निसर्गाच्या अगाध सौंदर्याशी सामंजस्य राखण्याचे आणि श्रद्धेच्या अत्युच्च शिखराशी एकरूप होण्याचे अनुभव. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये केलेल्या किन्नौर कैलाश आणि युल्ला कांडाच्या यात्रेनं आमचं आयुष्यच समृद्ध केलं!