लयनकथा । अमोघ वैद्य
लखुडीयारच्या खडकांवर कोरलेल्या मानवी आकृत्या पाहताना जणू अश्मयुगीन काळ जिवंत होतो. या आकृत्या इतक्या लांब आणि सडपातळ आहेत, की त्या हवेत तरंगत असल्यासारख्या वाटतात. कदाचित उत्साह आणि स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून तसं चितारलं असेल. जगभरात अशा लांब आकृत्यांना उडण्याचं किंवा हलकं होण्याचं रूपक दिलं जातं.
देवभूमी... जिथं साक्षात देवतांना क्षणभर विश्रांती घ्यावी की कायमचं वास्तव्य करावं असा प्रश्न पडावा, अशी हिमालयाच्या सान्निध्यातील अलौकिक उत्तराखंड भूमी! बर्फाच्छादित शिखरांचा मुकुट, खळखळत्या सरितांचा कर्णमधुर नाद, हरित वनराजीचा रम्य परिसर आणि शांत खोऱ्यांचा सहवास यांनी सजलेली इथली धरा निसर्ग आणि अध्यात्माचा अनुपम संगम आहे.
येथील प्रत्येक कणात प्राचीन इतिहासाचे सूर गुंफलेले आहेत. प्रत्येक पर्वतात एका दैवी चैतन्याचा संचार आहे. उत्तराखंड ही केवळ तीर्थक्षेत्रांची धरा नव्हे, तर कला, संस्कृती आणि पुरातन वारशाचा एक समृद्ध कोश आहे.