

Wai Krishna River Ghat tourism
esakal
...आमच्या गप्पा सुरूच होत्या. काका न थकता किल्ल्यांबद्दल बोलत होते. वाईच्या त्या प्रसन्न सकाळी प्रभाकर काकांनी सह्याद्रीच्या कुशीतल्या निसर्गसंपन्न गडकोटांची माहिती देऊन माझं मन अगदी ताजतवानं करून टाकलं होतं. खूप साऱ्या गप्पा मारून आम्ही काकांचा निरोप घेतला अन् परतीच्या प्रवासाला लागलो...
दिवसभर वाई परिसराची भटकंती केल्यावर रात्री लवकर झोपून गेलो. गेल्या काही दिवसांपासून मनासारखी निसर्ग भटकंती होत असल्यामुळे मन अगदी प्रसन्न व उत्साही होते. त्यात वाईतला हा शेवटचा मुक्काम होता! सकाळी परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची या विचारात पहाटे पाच वाजताच जाग आली. रूमच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तर रस्त्यावर बरेचजण सकाळी फिरताना दिसले आणि काही क्षणात माझ्यातला भटक्या जागा झाला. पटकन आवरून मी साधनाला, माझ्या बायकोला सांगितले की तासाभरात कृष्णा काठावर फिरून येतो.
हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर मस्त थंडी पसरली होती. या गुलाबी थंडीने छान धुक्याची चादर पांघरली होती. वाईच्या या छान नैसर्गिक वातावरणातला भरपूर प्राणवायू आतमध्ये घेत मी होमस्टेच्या खाली आलो. आमच्या होमस्टेचे मालक, प्रभाकरकाकाही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर निघाले होते. मला पाहून ते हसत म्हणाले, ‘‘फिरायला निघाले?’’, मी ‘‘हो’’ म्हटलं. तसं काका म्हणाले, ‘‘सोबत जाऊ या.’’