

India unique museums guide
esakal
भूषण तळवलकर
कोणत्याही देशाच्या, प्रांताच्या संस्कृतीचा थोडक्यात वेध घ्यायचा असल्यास तिथल्या विविध संग्रहालयांची यादी पाहावी. चटकन अंदाज येतो! भारताच्या प्रमुख महानगरांप्रमाणे इतर शहरे, दूरस्थ नगरेही अनेक संग्रहालयांनी नटलेली आहेत. विषयवैविध्यही प्रचंड आहे! माझ्या कार्यालयीन आणि वैयक्तिक दौऱ्यांमध्ये भारतातील मी पाहिलेल्या सुमारे ८०-९० संग्रहालयांपैकी काही आगळ्यावेगळ्या नि मोजक्या संग्रहालयांचा हा परिचय.
मी पुण्यात राहतो. पुण्यातच विविध विषयांवरील दहाच्या वर उत्कृष्ट संग्रहालये आहेत. कोंढव्यात हाजी फरीदभाई शेख या ९३ वर्षे वयाच्या छायाचित्रण तपस्वीने आपले तन-मन-धन अर्पून फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि कॅमेरे यांना वाहिलेले खासगी संग्रहालय उभारले आहे. फरीदभाईंनी आपला व्यवसाय उत्तमरित्या विकसित करण्याबरोबरच देशभर फिरून शेकडो कॅमेरे आणि फोटोग्राफी उपकरणे खरेदी करण्याचा छंद जोपासला आणि १९६८मध्ये आपल्या स्वतःच्या इमारतीतच संग्रहालय सुरू केले, वाढवत नेले. परदेशांतूनही अनेक कॅमेरे त्यांनी मिळवले. संग्रहालयात १८३५पासूनच्या लाकडी कॅमेऱ्यापासून ते अत्याधुनिक कॅमेऱ्यापर्यंत सर्व प्रकार पाहायला मिळतात. जगातील सर्व ब्रँड्सचे संमेलनच त्यांनी भरवले आहे. तसेच सर्व प्रकारांचे फिल्म मूव्ही कॅमेरे आणि प्रोजेक्टर येथे आहेत. व्हिडिओ-८, बीटा, व्हीएचएस आणि हल्लीचे डिजिटल कॅमेरेही आहेत. कॅमेऱ्यांच्या विविध लेन्सेस, फिल्टर्स, मीटर्स, फ्लॅशगनसह इतर उपकरणेही पाहता येतात. फिल्म प्रोसेसिंग करणारे डेव्हलपर, एन्लार्जर, ग्लेझर अशी उपकरणेही मांडली आहेत. इतर अनेक प्रोजेक्टर्सबरोबरच सहा फूट उंचीचा ६०-७० किलो वजनाचा जुन्या काळचा एक मूव्ही प्रोजेक्टरही ठेवला आहे. फरीदभाईंना या संग्रहालयामुळे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांची मुले आणि नातवंडे आता या कामात त्यांना सक्रिय मदत करतात.