अवनीवाच्या गोष्टी । मैत्रेयी पंडित-दांडेकर
पुढच्या एक-दोन आठवड्यात फार्मर्स मार्केट मम्माच्या इतर फॅडांप्रमाणे नसल्याची आणि आता यातून माझी सहजासहजी सुटका होणार नसल्याची जाणीव झाली आणि त्यामुळे इथून पुढे ग्लास अर्धा रिकामापेक्षा अर्धा भरलेला बघायचं मी ठरवलं! रविवारी इथं हजेरी लावून मीपण बघता बघता करडई, माठ, आंबट चुका यातला फरक न बघता सांगू लागले! थोड्याच दिवसांत मी मराठीपेक्षाही गणितात प्रवीण झाले.
ज्या ज्या गोष्टींवरून मम्मा आणि जीजीची २५-३० वर्षं सातत्यानं शीत आणि कढत युद्ध झाली, अचानक त्याच सर्व गोष्टी माझ्या जन्मानंतर मम्माला अतिशय प्रिय वाटू लागल्या. ‘भाजीपाला’ हे त्याचे एक उत्तम उदाहरण! बटाट्याच्या जास्तीत जास्त कुरकुरीत काचऱ्यादेखील कुरकुरत खाणाऱ्या आमच्या एकेकाळच्या छोट्या मम्माला आता अचानक पालेभाज्यांवर ताव मारताना बघून ‘कदाचित पालक होण्यासाठी पालक खाणं अनिवार्य असतं’ असा अंदाज मी बांधला आणि मग अवनीनामक एक निरागस बालक आठवड्याची पालक खरेदी करण्यासाठी तिच्या खाष्ट पालकाबरोबर दर रविवारी सकाळी फार्मर्स मार्केट ऊर्फ कॅलिफोर्नियाच्या टापटीप मंडईत मुकाट्यानं जाऊ लागलं.
टळटळीत ऊन, पिरपिरणारा पाऊस, बोचरी थंडी, गळणारी नाकं, फ्रिजमधून वाहणारा ऐवज आणि माझी इच्छा यापैकी कशालाही न जुमानता वय वर्ष दीडपासून, एका टेंगशावर मी (आणि माझ्या टेंगशावर माकड), पाठीवर डायपर बॅग, दुसऱ्या खांद्यावर भाजीसाठी डझनभर पिशव्या आणि हातानं स्ट्रोलर ढकलत आमची ‘अष्ट’ नाही, ‘कष्ट’ नाही, तर ‘खाष्ट’भुजा माझी वरात सकाळी सात वाजता मंडईच्या दिशेनं काढू लागली.