डॉ. शशांक शहा
फॅटी लिव्हर हा यकृतात चरबीचा साठा वाढल्याने होणारा विकार असून, तो चुकीची जीवनशैली, आहार आणि काही वैद्यकीय कारणांमुळे होतो. सुरुवातीला ठळक लक्षणे नसलेला हा आजार नंतर यकृताच्या गंभीर आजारांमध्ये रूपांतरित होण्याचा धोका असतो.
मानवी शरीरातील यकृत हा सर्वात मोठा आणि बहुपयोगी अवयव आहे. पचनक्रिया, पोषकद्रव्यांची साठवण, विषारी घटकांचे निर्मूलन, ऊर्जानिर्मिती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे अशा असंख्य प्रक्रियांत यकृताचा सक्रिय सहभाग असतो. परंतु आधुनिक जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे, चुकीच्या आहारामुळे आणि शारीरिक हालचालींच्या कमतरतेमुळे यकृतामध्ये चरबी जमा होण्याचा वेग वाढला आहे. ही स्थिती म्हणजेच फॅटी लिव्हर. सुरुवातीला ही अवस्था साधी वाटली, तरी दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास त्या गंभीर आजारांमध्ये रूपांतर होण्याचा धोका सातत्याने वाढत आहे.
सामान्य स्थितीत यकृतामध्ये अल्प प्रमाणात चरबी असते (साधारण पाच टक्क्यांपेक्षा कमी). यकृतातील चरबीचे प्रमाण जेव्हा पाच टक्क्यांपेक्षा जास्त होते, तेव्हा ही अवस्था फॅटी लिव्हर म्हणून ओळखली जाते. ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास यकृताचे कार्य बिघडू लागते आणि गंभीर आजारांना आमंत्रण मिळते.