डॉ. सुहास हरदास
खेळता खेळता लहान मूल अचानक कोसळते. काय झाले, कशामुळे झाले याची तपासणी करताना त्याचे मूळ हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपथी या एका आनुवंशिक हृदयविकारापर्यंत जाते. अशा दुर्मीळ हृदयविकारावर लक्षणांच्या आधारे सध्या उपचार केले जातात. पण, थेट या आजारावरच उपचार करणाऱ्या क्रांतिकारी वैद्यकीय संशोधनाचा मागोवा...
हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपथी (HCM) या हृदयविकाराचे निदान लहान मुलांबरोबरच प्रौढांमध्येही होते. या आजारात हृदयाचे स्नायू गरजेपेक्षा जास्त जाडसर होतात. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. शरीराला आवश्यक प्रमाणात रक्त पोहोचत नाही. त्याचा थेट परिणाम रुग्णाच्या शरीरावर स्पष्टपणे दिसू लागतो. रुग्णाला दम लागतो. त्याच्या छातीत वेदना सुरू होतात.
रुग्णाच्या हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात. त्यातून रुग्ण थकलेला दिसतो. काही गंभीर रुग्णांमध्ये या लक्षणांची तीव्रता वाढून हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकादेखील वाढतो. या विकाराच्या बहुसंख्य रुग्णांमध्ये ही स्थिती शरीराबरोबर मनालाही थकवते. काही अंतर चालणेही रुग्णाला अतिकष्टदायक वाटते.
हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपथीच्या रुग्णासाठी प्रत्येक श्वास हा जगण्याची लढाई ठरवा असा असतो. यावर आतापर्यंत रुग्णाला दिसणाऱ्या लक्षणांच्या आधारे उपचार करण्याची पद्धत आहे. पारंपरिक बीटा-ब्लॉकर किंवा कॅल्शियम चॅनल ब्लॉकरसारखी औषधे फक्त तात्पुरता आराम देतात. पण, या दुर्मीळ हृदयविकारावर आवश्यक होते ते रामबाण औषध!