पादत्राणेनिर्मिती तंत्रज्ञान, चामडी वस्त्रप्रावरणे व आभूषणे आणि वस्तूनिर्मिती या क्षेत्राची, देशात व परदशेताही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. या क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाढत आहे. कौशल्यविकास अभियानांतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार, या क्षेत्रात पुढील काही वर्षांत रोजगार आणि स्वंयरोजगाराच्या विपुल संधी मिळू शकतात.
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरणारी संस्था म्हणजे फुटवेअर डिझाईन ॲण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (एफडीडीआय). भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेची स्थापना १९८६मध्ये करण्यात आली. २०१७मध्ये या संस्थेला इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा देण्यात आला. पादत्राणेनिर्मिती क्षेत्रात असा दर्जा मिळणारी ही देशातील एकमेव संस्था आहे. पादत्राणे आणि चामडी वस्तुनिर्मिती करणाऱ्या जगातील काही प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थांनी या संस्थेला अधिस्वीकृती दिली आहे.