

Life After Spouse Death
esakal
विद्या हर्डीकर-सप्रे
आपल्या आणि अमेरिकी संस्कृतीच्या तफावतीमुळे उतारवयात नवा साथीदार शोधून आयुष्याला नवा पंख जोडणं, हा विचारही अशक्य वाटणं स्वाभाविक आहे. विचार केलाच, तर आपल्या भाषेचा, नाहीतर किमान सांस्कृतिक कोशातला एकांडा साथीदार सापडणं कठीण असतं. ही सगळी अडथळ्यांची शर्यत वाटते.
उत्तररंगातील आयुष्याची काही रंगचित्रं पाहताना एकत्र आयुष्य, एकल आयुष्य यांचा थोडाफार विचार आपण मागच्या लेखात (एक पंख छाटल्यावर... ता. २५ जुलै) केला. कदाचित एकांड्या आयुष्यात नव्या जोडीदाराचा प्रवेश झाला, तर त्यावेळच्या आणि त्यानंतरच्या काळाला ‘नवा पंख नवा सांगाती’चा काळ म्हणता येईल!
माणसं हळूहळू एकल आयुष्यात स्वतःला रमवायला शिकतात. मैत्री मेळावे, प्रवास गट असं काहीतरी शोधत मित्रपरिवार गोळा करतात, सहलीला जातात. पण ‘दिवसभर छान सहलीचा आनंद घेतल्यावर, मित्रमंडळींबरोबर गप्पा रंगल्यावर छान वाटतं अन् संध्याकाळी घरी आल्यावर मात्र एकटेपणा खायला उठतो...’ ही भावना अनेक एकांडे शिलेदार वेळोवेळी व्यक्त करत असतात. असं असलं तरीही नवी संगत शोधण्याचा विचार येणंदेखील त्यांना पाप वाटतं, असंही ते सांगतात. ‘आम्ही वयाची पन्नाशी ओलांडलेल्या अमेरिकन लोकांच्या वसाहतीत राहतो. तिथं कोणाचा नवरा किंवा बायको गेल्यावर ते वर्षाच्या आतच दुसरा घरोबा करून मोकळे कसे होतात याचं आश्चर्य वाटतं. आपल्याला कल्पनासुद्धा करवत नाही. अमेरिकन लोकांची मनोभूमिका समजणं आमच्या आवाक्याबाहेरचं आहे’ अशी संभाषणं ऐकू येत असतात.