संपादकीय
आला पाऊस मातीच्या वासांत ग,
मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग
शान्ता शेळकेंच्या या ओळी कानावर पडल्या, की मन क्षणात पहिल्या पावसाच्या सरींत हरवून जातं. ओलसर मातीचा गंध दरवळतो, ढग दाटून येतात आणि आठवणींची हळवी सर बरसू लागते. त्या पहिल्या सरी काहीशा जादुई असतात. निःशब्द असूनही मनात खोल रुजणाऱ्या. त्या सरींमध्ये ओलावा असतो, पण तो फक्त बाहेरचा नाही; हळुवार भावनांना न्हाऊन टाकणारा. पावसाचे थेंब म्हणजे फक्त निसर्गाच्या ऋतुचक्राचा भाग नाहीत; ते हळव्या मनात कोरलेले क्षण आहेत. डोळ्यांत कायमची साठवलेली आठवण आहे.