डॉ. प्रणिता अशोक
आहार हा केवळ भूक भागवणारा घटक नसून, तो शरीराची सर्व यंत्रणा नीट चालवणारा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक रोगाची सुरुवात चुकीच्या आहारातून होते आणि बरे होण्याची सुरुवातसुद्धा आहारातूनच होते. त्यामुळे ‘आहार हेच औषध’ हे ध्यानात ठेवून जीवनशैली सुधारली पाहिजे.
बिघडलेला आहार, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव हे आरोग्य बिघडविणारे महत्त्वाचे घटक ठरत आहेत. यातल्या आहार या सर्वात महत्त्वाच्या घटकाचा इतर दोन घटकांवर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आहार सुधारण्याला पर्याय नाही.
लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, थायरॉइड, पीसीओडी, गुडघेदुखी, पोटाचे आजार, हृदयरोग यांसारखे जीवनशैलीशी संबंधित आजार आपण चुकीच्या आहारामुळे ओढवून घेतलेले आहेत. जर योग्य प्रमाणात आणि संतुलित आहार घेतला, तर हे आजार सहज टाळता येऊ शकतात. संतुलित आहार आपले वजनही नियंत्रणात ठेवतो. म्हणूनच आहाराकडे औषध म्हणून पाहणे महत्त्वाचे ठरते.