सुकीर्त गुमास्ते
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ पैसे कमवण्यासाठी फूड व्ह्लॉगिंगच्या क्षेत्रात येऊ नका; काहीतरी व्यक्त करण्याची प्रचंड ओढ असेल, तुमची खवय्येगिरी लोकांपर्यंत पोहोचवायची असेल, तरच या. निर्मितीप्रक्रियेचा आनंद घेऊ शकत असाल, तरच चांगले पैसे कमवता येतील. एखाद्या उत्तम गृहिणीला किंवा शेफला पदार्थ केल्यानंतर मिळणाऱ्या कौतुकापेक्षा प्रत्यक्ष पदार्थ करण्याची प्रक्रिया जास्त आनंद देणारी असते, अगदी तसंच इथंसुद्धा आहे!
कंटेन्ट क्रिएटर्सच्या विश्वात सध्या सगळ्यात जास्त कुतूहलानं विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कंटेन्ट क्रिएटर्स किंवा इन्फ्लुएन्सर्स नक्की पैसे कमवतात तरी कसे? म्हणजे व्ह्यूज मिळाले, लाइक्स मिळाले, कॉमेंट्स भरपूर आल्या की पैसे मिळतात का? तसं असेल, तर ते देतं कोण? जाहिराती कशा मिळतात? नक्की कसं चालतं हे सगळं अर्थकारण?