आशिष पेंडसे
आपल्या दैनंदिन गरजांसाठीच्या उत्तमोत्तम तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या पादत्राणांमध्ये खरे नावीन्य आले ते क्रीडा आणि फॅशन या दोन क्षेत्रांमुळे. क्रीडा क्षेत्रात खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा उंचाविण्यात पादत्राणे सकारात्मक प्रभाव कसा पाडतील, यावर संशोधन होत आहे.
माणसाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर त्याच्या पायाकडे पाहावे असे म्हणतात आणि खरेच आहे ते! अंगावरचे कपडे कितीही परीटघडीचे असले आणि पायातील वहाणा जर जीर्ण झालेल्या असल्या, तर त्या बरेच काही सांगून जातात. म्हणूनच, मानवाच्या आदिम अस्तित्वापासून पादत्राणांवर आधारित नोंदी लक्षवेधी ठरतात.
अगदी, पाला-झुडपे इथपासून ते तंतू, धागे, चामड्यासारख्या घटकांपासून मानवाने पादत्राणे साकारली आहेत. राजेशाही थाटात पादत्राणांवर हिरे-माणक्यांची कलाकुसरदेखील केलेली आढळते. आपल्या पुराणकाळातील पादुकांना मोठे ऐतिहासिक संग्राह्यमूल्य आहे. अगदी, सोन्या-चांदीचा मुलामा दिलेल्या पादुका आपण श्रद्धास्थानी ठेवून भक्तिभावाने पूजतो.
पाऊल पडते पुढे...!
संपूर्ण जगाने आधुनिकतेची कास धरल्यावर झपाट्याने प्रगती झाली. आपले आयुष्यदेखील वेगाने बदलत गेले. त्यामध्ये आवडी-निवडी, राहणीमान, फॅशन सारे काही कालानुरूप बदलले. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जोरावर आयुष्यातील प्रत्येक घटकावर मोठा प्रभाव पडला. मग त्यामध्ये पादत्राणांचे पाऊलदेखील पुढेच पडणार! औद्योगिक क्रांतीनंतर खऱ्या अर्थाने पादत्राणांच्या व्यवसायाला पाय फुटले. चामड्याबरोबरच, रबर, कापड, कृत्रिम फायबर अशा वेगवेगळ्या स्वरूपांत आणि मटेरियल्समध्ये पादत्राणे तयार केली जाऊ लागली. तसेच, अनेकविध रंगरूपांचा साजदेखील त्याला देण्यात येऊ लागला.