अर्थविशेष । भूषण महाजन
गुंतवणूकदाराने आता रंजक कथनाच्या मागे पळणे सोडले पाहिजे. बाजारातील मोहरे बदलत आहेत. नव्या भागविक्रीचा नाद सोडला तरी पाहिजे किंवा पूर्ण अभ्यासाअंतीच त्यात गुंतवणुकीचा निर्णय घ्यायला पाहिजे. मिळालेल्या टिपेचा मागोवा घेताना ती कंपनी किमान नफा करतेय की तोट्यातच आहे इतके तरी बघावे.
शेअर बाजार ९ ते १६ फेब्रुवारीच्या सप्ताहात खालीखालीच जात राहिला. रोजच थोडीशी धुगधुगी असायची, कधी बाजार सुरू होताना तर कधी सेशन अर्धे झाल्यावर, तर कधी संपता संपता. पण बाजाराला जणू ॲक्रोफोबियासारखी उंचीची भीतीच वाटत होती! खाली जाण्याच्या धांदलीत निफ्टीने जुना (ता. २७ जानेवारीचा) तळ २२७८६ पार केला व २२७७४चा नवा तळ केला.