अरविंद रेणापूरकर
आजच्या काळात पासवर्डशिवाय दैनंदिन जीवनाची कल्पनाच आपण करू शकत नाही. अर्थात आताच पासवर्डची महती सांगण्याचे कारण काय, असा प्रश्न पडू शकतो. यामागचे कारणही तसेच आहे. काही वर्षांपासून स्टेफन थॉमस नावाच्या अब्जाधिशाने विसरलेल्या पासवर्डचे गारुड जगावर फिरत आहे. ते पुन्हा चर्चेत आले आहे. पासवर्डचे विस्मरण झाल्याने त्याला तब्बल ७७७ दशलक्ष डॉलरची डिजिटल ॲसेट गमावण्याची वेळ आली आहे. यावरूनच पासवर्ड किती मोलाचा आहे, हे स्पष्ट होते.
आजच्या डिजिटल युगात पासवर्ड हा आपला सर्वात मोठा सुरक्षिततेचा आधार असतो. पण तोच पासवर्ड विसरला तर काय होऊ शकते याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे स्टेफन थॉमस. स्टेफन थॉमस हा एक जर्मनीत जन्मलेला आणि नंतर अमेरिकेत राहणारा प्रोग्रॅमर. त्याला तंत्रज्ञान आणि डिजिटल चलनांमध्ये प्रचंड रस होता. २०११मध्ये त्याने बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली आणि त्यातील एक मोठा हिस्सा एका विशेष हार्ड ड्राइव्हमध्ये सुरक्षित ठेवला. सुरुवातीला बिटकॉइनची किंमत फारशी नव्हती, पण पुढे त्याची किंमत प्रचंड वाढली. त्या वॉलेटमध्ये ७,००२ बिटकॉइन्स साठवलेले आहेत. आज त्या बिटकॉइन्सची किंमत अंदाजे ७७७ दशलक्ष डॉलर म्हणजेच हजारो कोटींमध्ये आहे. हा हार्ड ड्राइव्ह उघडण्यासाठी लागणारा पासवर्ड स्टेफन थॉमस विसरला.