रिपोर्ताज।प्रसाद कानडे
कधी काळी ‘सायकलींचं शहर’ म्हणून ओळखलं जाणारं पुणं, आज ‘हेलिकॉप्टरची राजधानी’ म्हणून नावारूपाला येत आहे. शांत, हिरवंगार पुणं आता वेगवान झालं आहे. टेक्नोसॅव्ही पिढीच्या उमेदीला गती देत आहे. सायकलींचं शहर ते हेलिकॉप्टरचं शहर असा पुण्याचा स्थित्यंतरशील प्रवास मांडणारा एक वेगळा, विचारप्रवृत्त करणारा रिपोर्ताज...
तो काळ काही फार जुना नाही. १९७०-८०चे दशक. पुण्यातील टिळक चौक. सायकलस्वारांची एक अखंड रांग असायची. कामगारांपासून ते डॉक्टरांपर्यंत आणि शिक्षकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी सायकल हेच वाहतुकीचं साधन होतं. तेव्हा स्टेटस ही संकल्पनाच नव्हती. सायकल पार्किंगसाठी जागा अपुरी पडायची. कारण पुणे तेव्हा सायकलींचं शहर होतं.