प्रतिनिधी
भारतात सर्वाधिक आंबा पिकत असला तरी आंब्यांच्या एकूण जागतिक उत्पादनातली आपली दर हेक्टरी सरासरी वाढवणे, जैविक उत्पादनांचा प्रसार, निर्यात मानकांवर काटेकोर नजर, आंब्यांच्या नव्या जाती, त्यांची जीआय मानांकने, वाहतूक खर्चावर नियंत्रण आणि कोल्ड-स्टोअरेजेससारख्या सुविधांचा विस्तार अशांसारख्या उपायांमधून भविष्यात आंबा निर्यातीला चालना देणे शक्य आहे.
शेतीचा शोध लागल्यानंतर माणसानं जेव्हा केव्हा पद्धतशीरपणे उपयोगी झाडांच्या लागवडीला सुरुवात केली, त्यात सगळ्यात आधी लागवडीखाली आणलेल्या वनस्पतींमध्ये आंबा असणार. गेली किमान चार हजार वर्षे भारतात आंब्याची लागवड होते आहे, यावर कृषिसंशोधकांमध्ये एकमत दिसते.
भारत हा जगातला सर्वात मोठा आंबा उत्पादक देश आहे, आणि आंब्याची निर्यात हा आपल्या निर्यात व्यापाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण २०२३-२४ या आर्थिक वर्षात अमेरिका, यूके, जपान, ऑस्ट्रेलियासारख्या प्रमुख बाजारांसह ४१ देशांमध्ये आंब्याची निर्यात केली. गेल्या काही वर्षांत भारतीय आंबा निर्यातदारांनी इराण, मॉरिशस, चेक प्रजासत्ताक, नायजेरियासारख्या नवीन बाजारपेठाही विकसित केल्या आहेत.