ग्लोबल महाराष्ट्र : डॉ. रघुनाथ माशेलकर
एक विद्यार्थी मला म्हणाला होता, आम्हाला पुढचा सत्या नडेला किंवा सुंदर पिचाई व्हायचे नाही, तर आम्हाला आमचे मायक्रोसॉफ्ट आणि गुगल निर्माण करायचे आहे. माझ्या मते, उद्योजकतेमध्ये अशीच धगधगती आग हवी आहे.
ग्लोबल आंत्रप्रेन्युअर कॉन्क्लेव्ह ही संकल्पनाच विलक्षण आहे. ही उद्योजकीय परिषद नुसत्या विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभाव टाकणारीही आहे. एक वाक्य मी नेहमी ऐकतो, ‘‘तुम्ही महाराष्ट्रीय माणसाला महाराष्ट्राबाहेर घेऊन जाऊ शकता, पण त्याच्या मनातला महाराष्ट्र कधीच बाहेर काढू शकत नाही.’’ या परिषदेला उपस्थित राहिलेल्या प्रत्येक मराठी माणसाने हे सिद्ध केले आहे.
आयोजकांपैकी एक असलेल्या गर्जे मराठीचे अध्यक्ष आनंद गानू यांची NRM (Non-Resident Maharashtrian) ही संकल्पना मला खूप आवडली. ह्या उपक्रमामुळे महाराष्ट्राला जागतिक स्तरावर ओळख मिळेल, राज्याच्या जीडीपीमध्ये भर पडेल. गर्जे मराठीची सभासदसंख्या आता १५ हजार आहे. ही संख्या एका वर्षात दीड लाखावर नेणे शक्य आहे. त्या दृष्टीने संस्थेने विचार करावा.